| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुतर्फा उभी असलेली वाहने आणि खड्डेमय रस्ते यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि लहान मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत आणि त्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात बाहेर ठेवले आहे. प्रशासनाला याची जाणीव कधी होणार?
पनवेल महानगरपालिकेकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्याचे काम सुरू असले, तरी हा उपाय निष्फळ ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यांतील खडीचे दगड उडून पादचाऱ्यांना दुखापत होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपायांऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्त्यांची उभारणी करण्याची मागणी जोर धरत आहे. याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेज लाईनची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांची अधिकच दुर्दशा होत आहे. ही कामे नेमकी कधी पूर्ण होणार, याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पनवेल हे झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जात असले, तरी मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना आजही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू असतानाच खड्डेमुक्त रस्ते, रखडलेली ड्रेनेज कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेलकरांकडून होत आहे.
पावसामुळे पनवेलच्या रस्त्यांची चाळण
