15 विद्यार्थ्यांना 250 हून अधिक गुण; यशस्वी विद्यार्थ्यांचा कळंबोलीत गुणगौरव
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा बरोबरच राष्ट्रीय सैनिक स्कूल परीक्षेमध्ये सातत्याने उत्तरेकडील राज्यांचा दबदबा राहिलेला आहे. मात्र, ही मक्तेदारी आता महाराष्ट्रातील विद्यार्थी मोडीस काढू पाहत आहेत. तसेच, या प्रवेश परीक्षेमध्ये पनवेलचे मुलं-मुली सुद्धा चमकले आहेत. कळंबोली येथील आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या तब्बल 15 विद्यार्थ्यांनी 250 हून अधिक गुण मिळवत आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली असहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा वसाहतीतील ससून हॉलमध्ये रविवारी (दि.15) गुणगौरव करण्यात आला.
देशभरामध्ये विविध शहरांमध्ये सैनिकी स्कूल आहेत. अत्यंत दर्जेदार शिक्षण, त्याचबरोबर शिस्तप्रियता, देशप्रेम याव्यतिरिक्त आयएएस, आयपीएस आणि एनडीएमध्ये जाण्यासाठी खडतर प्रशिक्षण आणि शिक्षण देणाऱ्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळत नाही. त्यासाठी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्रचंड स्पर्धा आणि त्याचबरोबर अत्यंत अवघड ही परीक्षा असते. कळंबोली येथे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना यासाठी तयार केले जाते. त्यांना अभ्यासक्रम शिकवून त्यांची पूर्णपणे तयारी करून घेतली जाते. यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पंधरा विद्यार्थ्यांनी 250 हून अधिक गुण मिळवत नामांकित राष्ट्रीय सैनिकी स्कूल प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केली आहे. लवकरच याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, या विद्यार्थ्यांचा रविवारी (दि.15) गुणगौरव करण्यात आला. आय कॅनचे संस्थापक नवनाथ देशमुख, संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे, माजी आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, इन्स्टिट्यूटच्या कळंबोली केंद्राच्या संचालिका सीमा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. त्यांच्यावर पुष्पृष्टी करत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थी व पालकांनी आपले अनुभव कथन केले.
क्षितिजची थेट सहावीत मजल
सैनिकी स्कूल प्रवेश हा इयत्ता सहावीमध्ये दिला जातो. म्हणजे पाचवीत शिकणारे विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, खारघर येथील क्षितिज जाधव या विद्यार्थ्याने चौथीतच ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या या विद्यार्थ्याने 300 पैकी 296 गुण मिळवत थेट चौथीतून सहावीत प्रवेश मिळवला आहे.
अर्णव ठाकरे राज्यात पहिला
आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कळंबोलीच्याच्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत सुद्धा बाजी मारली. अर्णव ठाकरे 98.75 टक्के गुण मिळवून राज्यात पहिला आहे. त्याचबरोबर स्मरण गायकवाड (96.50 टक्के), राजवीर भोसले (93.50) टक्के व निमीष दळवी (93.50) टक्के या चार विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात पहिल्याच फेरीत निवड झाली आहे.






