पनवेलची मतदारसंख्या चार लाखांपार

मतदारयादी फेरतपासणीला वेग; 12 हजार नव्या मतदारांचे अर्ज

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीच्या विशेष सखोल फेरतपासणीला (एसआयआर) वेग आला आहे. सध्या मतदारसंघात 4 लाख 704 मतदारांची नोंद असून, यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांपैकी 12 हजार जणांनी नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज केला आहे. आगामी काळात आणखी 50 ते 80 हजार नवीन मतदारांचे अर्ज येण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात पूर्वी सुमारे 6 लाख 84 हजार मतदार होते. एसआयआर प्रक्रियेत त्यापैकी 4 लाख 704 मतदारांची नावे कायम राहिली असून, उर्वरित सुमारे दीड लाख नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मागील निवडणुकांतील मतदानाच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारयादीची फेरतपासणी केली जात आहे. एसआयआरमध्ये अर्ज न केलेल्या 2 लाख 83 हजार मतदारांच्या नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 89 हजार मतदारांची नावे 2002च्या मतदारयादीशी जुळली नाहीत, तर 61 हजार मतदारांच्या नाव, वय किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांनी सांगितले. संबंधित मतदारांना याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. 2002मध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघात केवळ 1 लाख 60 हजार मतदार होते. गेल्या 24 वर्षांत ही संख्या 4 लाखांवर पोहोचली आहे. विशेषतः खारघर आणि कामोठे परिसरात मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

मतदारयादी फेरतपासणीसाठी मतदारसंघातील 574 मतदान केंद्रांवर 574 बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती व आवश्यक कागदपत्रे घेत आहेत. नागरिकांना कागदपत्रे बीएलओंकडे प्रत्यक्ष देण्यासोबतच व्हॉट्सपद्वारे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाव वगळण्यापूर्वी संबंधित मतदाराला मोबाइल संदेश, प्रत्यक्ष नोटीस आणि सुनावणीची संधी दिली जाणार आहे. वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटनाही देण्यात येणार आहे.

मतदारांनी एसआयआर प्रक्रियेबाबत संभ्रम बाळगण्याची गरज नाही. बीएलओ 12 नोव्हेंबरपर्यंत घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती व कागदपत्रे घेतील. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत. नाव वगळण्यापूर्वी संबंधितांना सुनावणीची पूर्ण संधी दिली जाईल.

पवन चांडक
निवडणूक निर्णय अधिकारी
Exit mobile version