शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण

| पनवेल | प्रतिनिधी |

मे महिन्याच्या अखेरीस नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच पनवेल शहरातील पुस्तक दुकाने, गणवेश विक्री केंद्रे आणि शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये पालक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची नव्या वर्गासाठी तयारी सुरू झाली आहे.

नवीन पुस्तके, वह्या, दप्तर, बूट, गणवेश तसेच अन्य शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची धावपळ सुरू असली, तरी यंदा वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पुस्तकांचे वाढलेले दर, खासगी प्रकाशनांचे अतिरिक्त साहित्य आणि गणवेशांच्या वाढत्या किमतींमुळे शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा पालकांमध्ये सुरू आहे.

काही शाळांकडून विशिष्ट दुकानांतूनच साहित्य खरेदी करण्याचा आग्रह धरला जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या परवडीनुसार वेगवेगळ्या दुकानांतून साहित्य खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असून शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शालेय साहित्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवून पालकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

Exit mobile version