वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळाचा उपक्रम
| चौल | प्रतिनिधी |
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… या दत्तनामाच्या जयघोषात चौल-भोवाळे येथील दत्त टेकडीला गुरुवारी परिक्रमा घालण्यात येणार आहे. ढोलताशाच्या गजरात दुपारी 2.30 वाजता या सोहळ्यास प्रारंभ होईल, अशी माहिती वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळ चौलच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, दत्त मंदिराला 108 प्रदक्षिणा घालण्याचा सोहळा नुकताच या मंडळाच्या माध्यमातून मार्गशिर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी दि.14 रोजी उत्साही वातारवणात पार पडला. यावेळी शेकडो दत्तभक्त टेकडीवर उपस्थित होते. प्रत्येकाच्या मुखातून फक्त दत्तनामाचा जप होत होता. त्यामुळे संपूर्ण परिसर दिगंबराच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. दरम्यान, प्रदक्षिणेच्या यशस्वी आयोजनानंतर गुरूवार, दि.21 रोजी दुपारी 3.30 वाजता दत्त परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत आणि वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळाचे सभासद मेहनत घेत आहेत. तरी, दत्त परिक्रमेस मोठ्या संख्येने सर्व दत्तभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दत्त आरती मंडळ, चौल यांनी केले आहे. परिक्रमा सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी निकेश घरत 9821794192 यांच्याशी संपर्क साधावा.
असा असेल परिक्रमेचा मार्ग संपूर्ण दत्त डोंगराला प्रदक्षिणा घालण्यात येणार असून, पायी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परिक्रमेस दुपारी तीन वाजता दत्त मंदिरातून सुरूवात होईल. स्वामी समर्थ मंदिरमार्गे चौल-सराई अशी मार्गक्रमणा करीत दत्त मंदिर मुख्य प्रवेशद्वार व त्यानंतर पायरी मार्गाने मंदिराकडे मार्गस्थ होईल, याची दखल दत्तभक्तांनी घ्यावी, असे आवाहन दत्त आरती मंडळाच्या प्रमुखांनी केले आहे.
महाआरतीने परिक्रमेची सांगता दत्त परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन तासांहून अधिकचा कालावधी लागतो. दत्त महाराजांच्या पालखीचे मंदिरात प्रस्थान झाल्यानंतर महाआरती होईल. त्यानंतर नवनाथ मठात शेकापचे ज्येष्ठ नेते दत्तभक्त द्वारकानाथ नाईक (कबन अण्णा) यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर परिक्रमा सोहळ्याची सांगता होणार आहे.
अखंड हरिनाम सुरू चौल-भोवाळे येथील दत्तयात्रा मंगळवार, दि. 26 पासून पाच दिवस भरणार आहे. त्यानिमित्त मंगळवार, दि.19 पासून दत्तमंदिरात अखंड हरिनामास प्रारंभ झाला असून, पंचक्रोशितील अठरा गावे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.