| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीच्यानिमित्ताने लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले आहेत. राज्यभर भक्तिमय वातावरण असताना पनवेल शहरातील वीर सावरकर चौकासमोरील संत तुकाराम महाराज व पांडुरंग यांचे आकर्षक भित्तीचित्र मात्र, वाहनांच्या पार्किंगमुळे झाकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पनवेल महानगरपालिकेने शहर सुशोभीकरणाच्या उद्देशाने विविध चौक, रस्ते आणि भिंतींवर ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक विषयांवरील सुंदर चित्रे साकारली आहेत. मात्र, संबंधित भिंतींसमोर मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहने उभी राहत असल्याने या कलाकृतींचे सौंदर्य नागरिकांना पाहता येत नाही. विशेषतः संत तुकाराम महाराज आणि विठ्ठलाचे चित्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्तांचे लक्ष वेधून घेणारे असतानाही पार्किंगमुळे त्याचा भाव आणि संदेश हरवत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील अनेक भित्तीचित्रांची ही हीच अवस्था असून, पार्किंगच्या अनियोजनामुळे सुशोभीकरणावर खर्च झालेला निधी व कलाकारांची मेहनत वाया जात असल्याची टीका होत आहे. भित्तीचित्रांसमोर ‘नो पार्किंग’ची प्रभावी अंमलबजावणी करून या कलाकृती सर्वांसाठी खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







