गावावर मृत्यूची टांगती तलवार
| महाड | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाड तालुक्यातील पारमाची गावावर 29 वर्षांपूर्वी दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या गावातील घरांना पुन्हा तडे पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, शासनाने गावाचे त्वरित पुनर्वसन करावे अशी मागणी पारमाचीचे माजी सरपंच सुभाष मालुसरे व महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये व वरंधा घाटाच्या कुशीत वसलेल्या पारमाची या गावावर 28 जून 1994 रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला होता. तर अनेक घरे जमीनदोस्त झाली, पाळीव जनावरे दरडीखाली गाडली गेली. त्याच गावात पुन्हा एकदा घरांना तडे गेले असून अनेक घरे कोसळण्याच्या स्थितीत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
वरंधा घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या पारमाची गावाची लोकसंख्या 255 आहे, हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेले असून संपूर्ण गाव डोंगर उतारावर असल्याने या गावातील नागरिक पावसाळ्यात 1994 च्या पुनरावृत्तीनंतर कायम भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गावातील घरांना तडे गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत, याबाबत महाड तहसीलदार महेश शितोळे व प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी तातडीने याबाबत दखल घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांतर्फे पंचनामे करून वस्तुस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.
गावातील सद्यस्थितीतील चार घरे, एक मंदिर,व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी वास्तूंना तडे गेले आहेत, तसेच गावातील अंतर्गत रस्ता सुमारे दीड फूट खचला आहे. तर मुख्य रस्ता दोन वर्षांपूर्वीच खचले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वेळ पडल्यास या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याबाबत व पर्यायी जागेत त्यांचे स्थलांतरित करण्याबाबत उपाययोजना चालू केल्या आहेत.