। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा येथे कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, मृतदेह अर्धवट असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे.
येरवडा येथील न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. धक्कादायक म्हणजे मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले असून कवटी आणि कमरेच्या वरचा भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्ला आहे. मृतदेहाच्या कमरेखालचा काही भाग उरला आहे. येरवडा पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी (दि. 07) सकाळी 9 च्या सुमारास याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित व्यक्तिचा मृत्यू हा आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेह अर्धवट असल्याने हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची ओळख अद्याप पटलेली नाही.