। नवीन पनवेल । वार्ताहर ।
छतावर वाहनतळ असलेले राज्यातील पहिले स्थानक असा नावलौकिक असलेल्या हार्बर मार्गावरील खारघर रेल्वेस्थानकाला गेल्या काही वर्षांत विविध समस्यांनी घेरले आहे. 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटप करून प्रवासी वर्गासाठी ते खुले झाले होते. मात्र, त्यानंतर वाढणार्या प्रवासी संख्येमुळे या स्थानकात बेकायदा पार्किंग, छतामधून होणारी पाणीगळती या समस्यांसोबत अपुर्या तिकीट खिडक्यांमुळे प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. नोकरी, व्यवसायासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक मुंबई तसेच उपनगरात या स्थानकातून दैनंदिन प्रवास करतात. शिवाय शहरातील शैक्षणिक संस्थांमुळे विविध भागांतील हजारो विद्यार्थी दररोज या स्थानकातून येत असतात. असे असताना या शहरात तिकीट खिडक्यांच्या समस्येमुळे प्रवाशांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते.
स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडणार्या जागेवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील मोकळ्या जागेत रेडिमेड कपडे, चपला, खेळणी, भाजी विक्रेत्यांपासून भेळपुरी, पाणी पुरी विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच स्थानक परिसरात भिकार्यांनीही उच्छाद मांडला असून सिडको तसेच रेल्वे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे खारघर रेल्वेस्थानक कुर्ला रेल्वेस्थानक होण्यास वेळ लागणार नाही.
पिण्याच्या पाण्याचे कुलर बंद
खारघर स्थानकावर तीन फलाट असून दोन्ही बाजूने सहा ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कुलर आहेत. मात्र, एक-दोन कुलर वगळता सर्व कुलर बंद आहेत. या कुलरची अनेक वर्षांपासून साफसफाई केली नाही. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून पाण्याला दुर्गंधी येत असल्यामुळे विकत पाणी घ्यावे लागत आहे.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
स्थानकाच्या दोन्ही बाजूला स्वच्छतागृहे आहेत. त्यातील एक स्वच्छतागृह हे कधी चालू तर कधी बंद असते. त्यातील बेसिनमधील नळ गायब झाले आहेत. तसेच साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
अग्निशमन यंत्रणा बंद
खारघर रेल्वेस्थानकाच्या छतावर असलेल्या वाहनतळ परिसरात जवळपास पाचशेहून अधिक चारचाकी आणि तीनशेहून अधिक दुचाकीसाठी वाहनतळ आहे. दिवसाला या ठिकाणी दोन हजारांहून अधिक वाहने उभी केली जातात. या वाहनांच्या सुरक्षेसाठी सिडकोने स्थानकाच्या छतावर अग्निशमन यंत्रणा उभारली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही यंत्रणा बंद असल्यामुळे आगीच्या घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेप्रमाणे पनवेलवरून सी.एस.टीकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खारघर स्थानकावरून प्रवास करणार्या प्रवाशांना अनेकदा उभ्यानेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पनवेल सी.एस.टी रेल्वेच्या फेर्यांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
अॅड. अनंत ढवळे, प्रवासी