ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या ठिकाणी जाण्यासाठी नॅरोगेज वर चालविल्या जाणार्या मिनीट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची मोठी पसंती आहे. मात्र, नेरळ येथून माथेरान येथे जाण्यासाठी केवळ दोनच गाड्या असल्याने पर्यटक प्रवाशांचा हिरमोड होत आहे. त्यातच पहाटे लवकर येऊन मिनीट्रेनच्या तिकीट रांगेत तात्काळत उभे राहावे लागते. त्यामुळे ऑनलाईन तिकिटांची व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
माथेरान या ठिकाणी जाण्यासाठी ब्रिटिश काळात नेरळ-माथेरान-नेरळ अशी मिनीट्रेन सुरू करण्यात आली. 1972 मध्ये तेथे जाण्यासाठी मिनी ट्रेन हा एकमेव मार्ग होता. त्यानंतर रेल्वेच्या कामगारांनी केलेल्या संपामध्ये नेरळ-माथेरान असा घाटरस्ता श्रमदान करून बनविला गेला. मात्र, मुंबईपासून जवळचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये जाण्यासाठी नेरळ-माथेरान या मिनीट्रेनला प्रथम प्राधान्य दिले जाते. नेरळ येथून माथेरान जाण्यासाठी सकाळी 8ः50 वा.ची पहिली गाडी आहे. तर, दुसरी गाडी सकाळी 10ः25 वा. सोडली जाते. या ट्रेनमध्ये प्रवासी वर्गासाठी द्वितीय श्रेणीचे तीन डब्बे, तर प्रथम श्रेणीचा एक आणि सलून डब्बा अशी रचना असून एका मिनी ट्रेनमधून साधारण 107 प्रवाशांना जाण्याची सुविधा आहे. गाडीच्या एक तास आधी मिनीट्रेनची तिकीट खिडकी उघडते. त्यामुळे प्रवासी हे अगदी सकाळी गाडीच्या वेळेआधी येऊन तिकीट रांगेत उभे राहतात. ज्या प्रवाशांना मिनीट्रेनचे टिकीट मिळत नाही त्यांच्या उत्साहावर विरजन पडत आहे. त्यामुळे त्यांना नाहिलाजास्तव टॅक्सीने नेरळ-माथेरान घाट रस्ता मार्गाने जावे लागते. अशा प्रवासी वर्गाकडून नेरळ-माथेरानसाठी ऑनलाईन तिकिटांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.