। नेरळ । प्रतिनिधी ।
गेल्या 100 वर्षांपासून कर्जत येथील बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. मसाल्याच्या पदार्थांसाठी या मिरचीला महिलांची विशेष पसंती असते. त्यामुळे रायगडसह ठाणे, पुणे व मुंबईहून ग्राहक या बाजारात आपल्या आवडीची मिरची आणि मसाले खरेदीसाठी येत असतात. सध्या जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून, ही मिरची खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढत आहे.
आजकाल तयार मसाले बाजारात मिळत असले तरी मिरची खरेदी करून त्यात मसाल्याचे पदार्थ टाकून घरगुती मसाला बनविण्याची परंपरा कायम आहे. ग्रामीण भागात लग्न सोहळा ज्यांच्या घरी आहे अशा कुटुंबात साधारण वीस ते पंचवीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. कर्जतचा मिरची बाजार हा चार ते पाच महिने भरत असून, त्यात सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. थंडी कमी झाली की मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणेसह मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जतमधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यंदा किंमतीच्या बाबतीत मिरची खूपच ‘तिखट’ झाली आहे. परंतु, तरीही मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी होत असते.
100 वर्षांची परंपरा
सुमारे 100 वर्षांपासून कर्जतचा मिरची बाजार भरत आहे. कर्जत शहरातील महावीर पेठेत 10 ते 12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. हैदराबाद-वारंगल, आंध्रप्रदेश-गंटूर व तेलंगणा इत्यादी भागांतून मिरची येत असते. आज शहरातील बाजारपेठेतील मसल्याच्या दुकानांची संख्या कमी झाली आहे; मात्र, तरीदेखील कर्जतच्या बाजारातील मिरची ही महिला वर्गात अधिक प्रिय आहे. या बाजारपेठेत जयंतीलाल परमार, मदन परमार, शिवलाल गुप्ता हे व्यापारी आपल्या तीन-चार पिढ्यांपासून मिरचीचा व्यापार करत आहेत.
मी आज 80 वर्षांचा असून गेली 60 वर्षे कर्जत शहरात मिरची विकत आहे. एवढी वर्षे खात्रीने आणि सचोटीने व्यवसाय करीत असल्याने आम्ही जनतेचा विश्वास मिळविला आहे. 15 तास मिरची समोर असून देखील मी आजारी पडत नाही. मात्र, आमच्या नंतर पुढील पिढी हा व्यवसाय करीलच याची खात्री नाही. तरीदेखील माझी मुलं आणि सुना मदतीला असतात. त्यामुळे वर्षाकाठी 800 पोती मिरची विकण्यास मदत होते.
जयंतीलाल परमार,
मिरची व्यापारी