| पनवेल | प्रतिनिधी |
राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल बस आगारात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या तुडुंब गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बस आगार प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तात्काळ सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे.
डेरवली गावातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी पनवेल बस आगारात आले होते. एसटी बस येण्यास उशीर झाल्याने प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. नातेवाईकांना बसण्यासाठी जागा मिळावी या हेतूने हे ज्येष्ठ नागरिक स्वतः गर्दीतून बसमध्ये चढले आणि त्यांनी आसन मिळवले. नातेवाईक बसमध्ये स्थिरावल्यानंतर ते खाली उतरले आणि बसपासून काही अंतरावर गेले असता, त्यांना आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि पेंडंट चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पनवेल बस आगारात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चोरट्यांच्या वाढत्या हिमतीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







