पनवेल रेल्वे स्थानकावर तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांची धावपळ

| पनवेल | प्रतिनिधी ।

पनवेल रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची तांत्रिक अपडेट समोर आली असून, प्लॅटफॉर्मच्या रचनेत झालेल्या बदलामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्याने किंवा तांत्रिक कारणास्तव लोकल गाड्या थांबण्याच्या नियोजित जागेत बदल करण्यात आला आहे. आता गाड्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच पुढे जाऊन थांबत असल्याने प्रवाशांना डब्या पर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त अंतर चालावे लागत आहे.

या नवीन बदलामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीपासून ट्रेन पर्यंत पोहोचण्यासाठी मोठी पायपीट करावी लागणार आहे. विशेषतः ऐन गर्दीच्या वेळी डब्यापर्यंत धावपळ करताना प्रवाशांची ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. आज पासून नवीन आठवडा सुरू होत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. ही संभाव्य धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा किमान 15 मिनिटे लवकर घरून निघण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ट्रेन थांबण्याचे ठिकाण पुढे सरकल्याने ऐनवेळी होणारी घाई टाळण्यासाठी प्रवाशांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘ट्रेन प्लॅटफॉर्म आता लांब गेला आहे’ अशा आशयाचे संदेशही सोशल मीडियावर फिरत असून, स्थानकावर पोहोचल्यावर अतिरिक्त चालण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version