| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
मुसळधार पावसामुळे पनवेल रेल्वे स्थानकातील विविध समस्या पुन्हा ऐरणीवर आल्या असून, स्थानकाच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. छतामधून थेट प्लॅटफॉर्मवर पाणी पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पाणी चुकवत धावपळ करताना एखादा प्रवासी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून उभारण्यात आलेल्या छताचीच दुरवस्था झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असल्याने तातडीने गळतीची दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.







