| उरण | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या प्रस्तावित तिसरी मुंबई प्रकल्पाविरोधात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली होती. यावेळी 1 जुलै रोजी कोकण आयुक्तालयावर निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त व सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या मध्यस्थीने सोमवारी कोकण विभाग अपर आयुक्त फिरोद मुकादम व कोकण विभाग आयुक्त रुबेल अग्रवाल यांच्या दालनात स्वतंत्रपणे दोन बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत एमएमआरडीए तिसरी मुंबई विरोधी 124 गाव संघर्ष समिती, रायगडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत समितीकडून 1 जुलैच्या निदर्शने आंदोलन व शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. कोकण आयुक्तांनी तातडीने एमएमआरडीएचे प्रधान सचिव व आयुक्त यांच्यासमवेत बैठक लावण्याचे विनंतीपत्र देत येत्या 10 ते 15 दिवसांत बैठक घेण्याबाबत आश्वासीत केले. याबाबतचे दोन्ही लेखी पत्र एमएमआरडीए तिसरी मुंबई विरोधी 124 गाव संघर्ष समिती व रायगड समितीकडे दिले असून, 1 जुलैचे निदर्शने आंदोलन स्थगित करण्याची विनंती प्रशासनातर्फे समितीकडे करण्यात आली. त्या अनुषंगाने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, बैठक न झाल्यास स्थगित केलेले आंदोलन भविष्यात अधिक तीव्रपणे करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे.







