पासपोर्ट कार्यालय लांबल्याचं खापर पोस्टावर

खा. बारणेंचा दावा दिशाभूल करणारा, ठाकरे गटाच्या ठाकूर यांचा आरोप

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पोस्ट विभागाने खोडा घातल्याने पनवेलचे पासपोर्ट कार्यालय लांबल्याचा दावा मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केला आहे. खासदार बारणे यांचा हा दावा म्हणजे आपल्या अपयशाचा खापर पोस्ट विभागाच्या माथ्यावर फोडण्याचा प्रकार आल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी केला असून, पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आपण अपयशी ठरल्याचेच खा. बारणे यांनी मान्य केल्याचे ठाकूर यांचे म्हणणे आहे.

आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे पनवेलमध्ये लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरु होईल, अशी घोषणा खासदार बारणे यांनी 2017 साली केली होती. बारणे यांच्या या घोषणेमुळे ऑनलाईन प्रक्रियेनंतरही पासपोर्ट बनवण्यासाठी ठाणे पासपोर्ट कार्यालयात मारावी लागणारी फेरी कमी होईल, अशी अपेक्षा रायगडमधील नागरिकांनी व्यक्त केली होती. पासपोर्ट कार्यालयाच्या घोषणेनंतर पोस्ट कार्यालयाने जागेअभावी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यास खोडा घातल्याने मंजुरीनंतरही पनवेलकरांचे हक्काचे कार्यालय सुरु करण्यात विलंब लागला असल्याचे विधान खा. बारणे यांनी गुरुवारी (दि.7) पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत करून सरकारच्या अखत्यारीत असलेले पोस्ट विभाग लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याची एका प्रकारे कबुलीच खासदार बारणे यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, रायगडकरांसाठी जिल्ह्यातच पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी मागणी जिल्ह्यातील रहिवाशांची होती. रहिवाशांची ही मागणी लक्षात घेत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अलिबाग येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.पनवेलमधील कार्यालय मात्र अद्यापही रखडलेले आहे.

Exit mobile version