खुशखबर! ठाण्याला जायची गरज नाही…अलिबागमध्ये होणार पासपोर्ट कार्यालय

आ.जयंत पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालय गाठावे लागत असे. रायगडकरांची या त्रासातून सुटका करण्याच्या उद्देशाने आ. जयंत पाटील यांनी अलिबागमध्येच पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे. आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.7 जुन) या मागणीबाबतचे पत्र नितीन गडकरी यांना दिले.

रायगड जिल्हा हा फार मोठा आहे. त्यामुळे या जिल्हगातील दुर्गम भागातून येणार्‍या स्थानिकांना ठाणे येथे जाऊन पासपोर्ट संबंधित कामे करताना फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अलिबाग हे शहर रायगड जिल्हयाचे केंद्र स्थान असल्याने या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्यास जिल्हयातील लोकांची होणारी हेळसांड थांबावी व त्यांना पासपोर्ट संदर्भातील आपली कामे सुलभरित्या पार पाडता यावीत, या उद्देशाने आ. जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी केली.

रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे हे एकमेव कार्यालय आहे. यामुळे पोलादपूरच्या टोकापासून ते अलिबागच्या नागरिकांना पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेसाठी बरीच धावपळ करावी लागते. काही त्रुटी निघाल्यास पुन्हा ठाण्याला जाण्याची वेळ येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय थांबावी, या उद्देशाने आ. जयंत पाटील यांनी हा प्रश्‍न उचलून धरला आहे.

Exit mobile version