पथिराणा बनला करोडपती

| कोलंबो । वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये यशस्वी संघाची चर्चा होते, तेव्हा चेन्नई सुपर किंग्स हे नाव नेहमी आघाडीवर पाहायला मिळाले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाच जेतेपदं नावावर केली आहेत आणि अनेक युवा खेळाडूही घडवले आहेत. चेन्नईला यंदाच्या पर्वात साखळी सामन्यात गाशा गुंडाळावा लागला असला तरी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील त्यांची नवी सुरुवात ही चांगली झाली. युवा गोलंदाज मथीशा पथिराणा याच्या गोलंदाजीने यंदाही प्रभावित केले. ट्वेंटी-20 वर्ल्डकपसाठी त्याची श्रीलंकेच्या संघातही निवड झाली आणि त्यासाठीच त्याला आयपीएल 2024 मधून लवकर मायदेशात परतावे लागले. पथिराणाने आयपीएल 2024 मध्ये 6 सामन्यांत साठी 13 विकेट्स घेतल्या. 2022 मध्ये 19 वर्षीय पथिराणाला चेन्नईने 20 लाखांत करारबद्ध केले आणि आतापर्यंत 20 सामन्यांत त्याने 34 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या गोलंदाजीच्या शैलीशी मिळतीजुळती शैली पथिराणाची आहे आणि डेथ ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याचा चांगला वापर करून घेतला.

2023 च्या चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदात पथिराणाचा (19 विकेट्स) महत्त्वाचा वाटा होता. श्रीलंकेच्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघात (2020 व 2022) त्याने प्रतिनिधीत्व केले होते.आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहता लंका प्रीमिअऱ लीग 2024 साठी मोठी बोली लागली आहे. पथिराणाला कोलंबो स्ट्रायकर्स संघाने सर्वाधिक 1 कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आहे. लंका प्रीमिअर लीगच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या ऑक्शनसाठी 420 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आणि त्यात 154 लंकन खेळाडूंचा समावेश होता. मथीशा पथिराणाने 12 वन डे व 6 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत अनुक्रमे 17 व 11 विकेट्स घेतल्या आहेत.

Exit mobile version