| अलिबाग | प्रतिनिधी |
ऑनलाईन शिक्षणाच्या जगतामध्ये पाटीवरील शिक्षण कालबाह्य होण्याच्या मार्गावर असताना दसऱ्यानिमित्त जिल्हा परिषद शाळांमध्ये होणारे पाटीपूजन आजही तग धरून आहे. मंगळवारी पारंपरिक पध्दतीने पाटीवर सरस्वती काढून त्याची पूजा शाळांमध्ये विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पूर्वी दसऱ्याच्या निमित्ताने शाळांमध्ये पाटीपूजन केले जात होते. परंतु ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात झाली. त्यामुळे काळ्या रंगाची पाटी दिवसेंदिवस कालबाह्य होण्याच्या मार्गावर होती. मात्र आजही या पाटीला महत्व असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये सरस्वतीपूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पाटीवर व वहीवर सरस्वतीचे चित्र काढले. ती पाटी व वही घेऊन सकाळी विद्यार्थी शाळेत आले. एका हातामध्ये पाटी, वही तर दुसऱ्या हातामध्ये रुमालामधून थोडे तांदूळ, अबीर, गुलाल, फुले, पेन्सील, पेन, अगरबत्ती घेऊन शाळेत आले.शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना रांगेत बसवून वही व पाटीची पूजा करण्यात सांगितले. त्यानुसार फुले, गुलाल, वाहून पुजा करण्यात आली. मोबाईलच्या युगात रमणाऱ्या शाळकरी मुलांना एक वेगळा आनंद मिळाला.