तंबाखूविरोधात रुग्णांमध्ये प्रबोधन

| चणेरा | प्रतिनिधी |

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (दि.31) मे जागतिक तंबाखू विरोधीदिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने (दि.24) मे रोजी तंबाखू सेवनामुळे शरीरास होणारे गंभीर दुर्दर आजारासंबधी रुग्णांकरिता प्रबोधन व्याख्यान उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आयोजित करण्यात आले होते.

जिल्हा रुग्णालय अलिबागतर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय ससाणे म्हणाले की, तंबाखूचे सेवन आरोग्यास धोकादायक आहे. तंबाखूच्या सेवनाचे आजपर्यंत कितीतरी लोकांना स्वत:चे प्राण गमवावे लागलेले आहेत. सुरुवातीला मज्जा म्हणून जडलेली सवय ही कालांतराने अत्यंत घातक परिणाम घडवून आणत असल्याने मनुष्याचे त्यापासून आगोदरच सावध असणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय ससाणे होते. सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर, सुराज्य सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांची विषेश उपस्थिती होती. दंतरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा ससाणे यांनी व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्‍वनाथ देशमुख, तर आभार प्रदर्शन सिस्टर इंचार्ज उर्वी वाणी यांनी केले. कार्यक्रमास दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासी रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version