। अलिबाग । प्रतिनिधी ।
चोरोंडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण पांडुरंग अधिकारी यांचे रविवारी (दि.12) त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्व इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या या दानामुळे किमान चार जणांना दृष्टीचा लाभ होणार आहे.
लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष, उद्योजक नितीन अधिकारी यांचे नारायण अधिकारी वडील होत. ते स्पष्टवक्ते, तितकेच प्रेमळ स्वभावाचे होते. प्रारंभी त्यांनी म्हात्रे पेन कंपनीत सेवा केली. त्यानंतर त्यांनी चोरोंडे येथे पेनची नीब बनविण्याचा कारखाना उघडला होता. मापगाव परिसरात वीज आणण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. कृषीक्षेत्राची त्यांना विशेष आवड होती. ते पाठारे क्षत्रिय अष्टागर समाज, झिराड या संस्थेच्या कार्यकारिणीवर दीर्घ काळ कार्यरत होते. झिराड येथील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाजमंदिराची उभारणी करण्यात त्यांचा सिहाचा वाटा होता.
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या स.म. वडके विद्यालय, किहीम-चोंढीचे संचालक, विविध सहकारी भातगिरणी, चोंढीचे संचालक, ग्रामपंचायत मापगावचे सदस्य अशा विविध पदांवर राहून त्यांनी समाजाची सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दहावे मंगळवारी (दि.21) व उत्तरकार्य शुक्रवार (दि.24) असल्याचे अधिकारी कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.