नेरळ-माथेरान घाटातील रेल्वे मार्गावरील दरडी हटविल्या
नेरळ | प्रतिनिधी |
युनेस्कोच्या पारितोषिक मिळविण्यासाठी सज्ज झालेली माथेरानची राणी म्हणजे मिनीट्रेन ही गेली दोन ते अडीच वर्षे नेरळ-माथेरान मार्गावर बंद अवस्थेत आहे.दरम्यान जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसात वॉटर पाईप स्टेशन पासून पॅनोरमा पॉइंटच्या खालील बाजूस काही भागात दरडी कोसळल्या असून पावसाचा वेग मंदावल्या नंतर त्या दरडी हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकाच सुशोभिकरण
9 ऑगस्ट रोजी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकासाठी माथेरान मिनीट्रेनचे नामांकन झाल्यानंतर माथेरान मिनिट्रेनच्या मार्गावर मोठमोठे बदल होताना दिसत आहेत. सिनियर सेक्शन इंजिनियर सुशील सोनावणे यांनी या मार्गावरचा कार्यभार घेतल्यानंतर भर पावसात रेल्वेच्या बाजूने गटार काढून रेल्वे मार्गावरील अडथळे दूर केले तर नेरळ-माथेरान या रेल्वे मार्गावर नवीन स्लीपर टाकण्यासाठी सिमेंटचे स्लीपर येत आहेत.दररोज रेल्वे मार्ग सफाई होत आहे,माथेरानच्या स्थानकामध्ये बदल केले जात आहेत.दरम्यान या स्थानकाचे नूतनीकरण ही करण्यात आले आहे.
18 ते 23 जुलैपर्यंत माथेरानमध्ये 1257 मिलिमीटर पाऊस झाला होता त्या पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामध्ये वॉटर पाईप ते पॅनोरमा पॉइंटचा खालचा भाग येथील रेल्वे मार्गात दरडी पडल्या आहेत.पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर रेल्वेने दरडी हटविण्याचे काम सुरू केले आहे.पॉकलनच्या साहाय्याने मोठं मोठे दगड फोडण्याचे काम सुरू असून मलब्याचे प्रमाण जास्त असल्याने व भाग अरुंद असल्याने तसेच एक बाजूला उंच डोंगर आणि एक बाजूला दरी असल्याने पोकलन नेणे शक्य नव्हते ट्रेनच्या साहाय्याने हे पोकलन दरडीच्या ठिकाणी नेण्यात रेल्वेला यश आले.त्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू असून 15 ते 20 दिवस दरडी बाजूला करण्यासाठी लागू शकतात असा अंदाज कर्मचार्यांकडून व्यक्त केला जात आहे.