शेतीच्या नुकसानीची भरपाई द्या

सरेभाग ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
| पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील सरेभाग बांधणवाडीतील पाचशे ते सहाशे एकर सुपिक जमिनीत खारे पाणी घुसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीला पंतप्रधान ग्रामसडक विभाग, खारलँड व संबंधित ठेकेदार जबाबदार असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची मागणी आहे. तसेच शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला वाशी ते सरेभाग या अंदाजे साडेचार किलोमीटरच्या रस्त्याचे काम सन 2018 मध्ये सुरु झाले. सदरचे काम सुरु झाल्यापासून ते नित्कृष्ट होत असल्याची ग्रामस्थांची व ग्रुप ग्रामपंचायत वाशीची सतत तक्रार आहे. संबंधित इंजिनिअर व ठेकेदाराने आतापर्यंत झालेले काम व्यवस्थित केलेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून दोन वर्षांपूर्वी सदर रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा जाऊन वारंवार रस्ता नादुरुस्त झाला होता. काम मुदत उलटून पाच वर्षे झाल्यानंतरही पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थामध्ये प्रचंड नाराजी असून, रस्त्याअभावी सरेभाग ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.

काही दिवसांपूर्वी या रस्त्यातील बांधणकर वाडीजवळच्या पुलाचे काम सुरु होते. या पुलाच्या कामात पाईप वापरले गेले आहेत. सदर पाईप हे या खाडीच्या बॉटमलेवलपेक्षाही अर्धा ते एक फूट खोल टाकले जाण्याची आवश्यकता होती व तशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, अधिकारी व ठेकेदाराने ग्रामस्थांच्या सूचनेकडे दुलक्ष करून काम रेटून नेले. हे काम सुरु असताना भरती- ओहोटीच्या वेळा लक्षात घेतल्या जात नसल्याने भातशेतीचे वारंवार नुकसान होत आहे. सरेभाग बांधणकर वाडीजवळच्या पुलाचे कामात लोकांची वहिवाट बंद करून, वहिवाटीचा बांध फोडून भर उधाणात लोकांची सूचना लक्षात न घेता खारलॅन्ड विभागाच्या अधिकार्‍यांनी बांधाला चर देऊन मिठागराला पाणी दिले. मात्र, समुद्राचे पाणी अडवण्यासाठी तयार करण्यात आलेला बांध डोंगरमातीमिश्रित मुरुम दगडाचा असल्याने उधाणाच्या पाण्याने संपूर्ण फुटला व पाच-शहाशे एकर सुपिक भातशेतीत अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खारेपाणी शिरून वाशी-सरेभाग परिसरांतील भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान त्यावेळी झाले.

 पीएमजीएसवाय विभागाकडून गेली पाच वर्षे सुरु असलेले सरेभाग रस्त्याचे व रस्त्यांतिल पुलांचे काम अतिशय संथगतीने व अतिशय नित्कृष्ट दर्जाचे होत आहे. संबंधित ठेकेदाराला तो करत असलेल्या चुकीच्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी काही सूचना केली तर हा ठेकेदार काम बंद करून जाण्याची धमकी ग्रामस्थांना देतो. चुकीचे काम डोळ्यादेखत होत असतानाही पीएमजीएसवायचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी का घालतात, हा प्रश्‍न वारंवार उपस्थित होत आहे. सरेभाग गावातील भातशेतीत खारेपाणी शिरल्याची बातमी ग्रामस्थांनी लगेचच उपविभागीय अधिकारी पेण, तहसिलदार पेण, पीएमजीएसवाय व खारलॅन्ड विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. प्रत्यक्ष घटनेची पहाणी करायला पीएमजीएसवायचे अधिकारी खेडेकर, खारलॅन्डचे अधिकारी अतुल भोईर, सर्कल अधिकारी सावंत मॅडम, तलाठी जे.पी. हाले हे घटनास्थळी उपस्थित होते. ज्या ठेकेदाराच्या चुकीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले, तो ठेकेदार यावेळी हजर राहिला नाही. यावेळी शेकडो नुकसानग्रस्त ग्रामस्थांसोबत ग्रा.पं. सदस्य रुपेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झेमसे, शिवतेज फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, बळीराम पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज म्हात्रे, गजानन ठाकूर, मच्छिंद्र म्हात्रे, राजू पाटील, गिरीष म्हात्रे इत्यादी प्रमुख मंडळी उपस्थित होती.

ठेकेदाराच्या आणि संबंधित अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी सलग दोनवेळा झालेल्या भातशेती नुकासानीची चौकशी महसूल विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून होऊन भातशेतीचे नुकसान ज्यांच्यामुळे झाले आहे, त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून ती नुकसान भरपाई महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी, अशी मागणी सर्वच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी यावेळी केली आहे. सोबतच चुकीच्या पद्धतीने व विना इस्टिमेंट होणार्‍या कामाची चौकशी कॉलेटी कंट्रालरमार्फत व्हावी सोबतच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या गुणवत्ता समन्वयक, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी सरेभाग रस्त्याच्या कामात लक्ष घालून कामाची गुणवत्ता तपासण्यासाठीदेखील ग्रामस्थांमार्फत प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी दिली.

Exit mobile version