| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून जाणारे पादचारी संतोष पानवलकर (56) यांचा टेम्पोच्या धडकेत मुत्यु झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वादोनच्या सुमारास एक आयशर टेम्पो तेलवडे गावातील चौधरी फर्निचर दुकानासमोरील रस्त्यावर चालक राम कुमार शाम बिन्द याने क्लिनर खाली न ठेवता टेम्पो मागे घेतला. त्याचवेळी त्या टेम्पेच्या मागुन चालत जाणारे पादचारी संतोष सुंदर पानवलकर (56) यांना धडक बसली आणि ते रस्त्यावर पडले. त्यावेळी त्या टेम्पोचे मागचे चाक त्यांच्या खांद्यावरून गेले आणि ते गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती मिळताच मुरूडचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश गायकवाड व वाहतुक पोलीस नाईक किशोर बठारे हे घटनास्थळी पोचले. तसेच, ग्रामस्थ व नातेवाईकांच्या सहाय्याने संतोष पानवलकर यांना तात्काळ मुरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संतोष पानवलकर यांना मृत घोषीत केले. त्यामुळे चालकाविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुरुड पोलीस करित आहेत.






