। रेवदंडा । प्रतिनिधी ।
कोर्लईनजीक पेट्रोल पंपाजवळ रेवदंडाकडून मुरूडकडे जाणार्या एसटीने पादचार्याला धडक दिली. यात पादचाऱ्याचा दुर्देवी मुत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला असून गजानन भोबू (62) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील कोर्लईनजीक पेट्रोल पंपाजवळ रेवदंडा-मुरूड रोडवर हा अपघात झाला. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रेवदंडा बाजूकडून बोर्ली बाजूकडे जाणारी एसटी बस (एम.एच.20 बीएल 3242) चालकाने रस्ताच्या बाजूने चालणाऱ्या 62 वर्षीय गजानन भोबू यांना मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यात त्यांचा दुर्देवी मुत्यू झाला. या अपघातानंतर एसटी चालक घटनास्थळावरून पळून गेला, अशी तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे अपघातातील मृत गजानन भोबू यांच्या पत्नी निलिमा गजानन भोबू यांनी नोंदविली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोसई मढवी हे सहा.पोलीस निरिक्षक श्रीकांत किरविले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.