। उरण । वार्ताहर ।
ब्लूम ऑलिम्पियाड संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड स्पर्धेत सेंट मेरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज उरणच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादित केले आहे. शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी अन्वय अमित पाटील हा राष्ट्रीय स्तरावर ‘तर्कशास्त्रीय युक्तिवाद’ या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशातील पंचवीस राज्यांमधून एकूण साडेसातशे शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अन्वय पाटील याने राष्ट्रीय पातळीवर प्रथम येण्याचा बहुमान मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. सातत्य, मेहनत , चिकाटी या गुणांच्या बळावर त्याने हे घवघवीत यश संपादित केले आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर मार्शल लोपेझ, प्राचार्या सिस्टर मेरी कोनीकरा, रिबेका डिसोझा, संगीता पाटील, अनिता कोळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.