| कोलाड | वार्ताहर |
औद्योगिक सुरक्षा दलाची रॅली गुरुवारी (दि.20) कोलाड नाक्यावर आली असता या रॅलीचे कोलाड पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कोलाडच्यावतीने स्वागत करण्यात आले.
भारताच्या किनारी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि सागरी सीमांवर देखरेख वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित तट-समृद्ध भारत यांची रॅली निघाली असून, केंदीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून 7 मार्च रोजी गुजरातमधील कच्छ येथील लक्षद्वीप किल्ल्यापासून ही रॅली सुरू झाली आणि 1 एप्रिल रोजी कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकात संपेल. या कालावधीत 9 राज्यांमधून 6,553 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला जाणार आहे. या सायक्लोथॉनमध्ये 100 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले आहेत.
कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते, नरेश पाटील, शिंदे, पाटील, राष्ट्रवादी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, उत्तम बाईत, सरपंच शर्मिला सांगवेकर, रवींद्र सांगवेकर, संजय मांडुलस्कर, राजेश कदम, रवींद्र तारू, संजय कुर्ले, संदीप बाईत, अब्दुल अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी, कोलाड ग्रामपंचायतीमधील नागरिक, परिसरातील पोलीस पाटील, सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.