विक्रम-मिनिडोअरवाले वार्यावर
। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्याची जीवनवाहीनी समजली जाणारी विक्रम-मिनीडोअर आहे. विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटना आपल्या वाहनांसाठी 1997 पासून पेण शहर भूखंड क्र.100 च्या जागेवर अधिकृतरित्या थांब्याचा (स्टँड) वापर करत आहेत. हया अगोदर ही जागा टांगा वाहकांसाठी थांबा म्हणून आरक्षित होती. त्यामुळे 1997 ला याच जागेचा उपयोग विक्रम मिनीडोअर थांब्यासाठी केला. कारण कालान्वये टांग्याची जागा रिक्षा, विक्रम मिनीडोअर यांनी घेतल्याने त्या आरक्षित जागेचा उपयोग स्टँडसाठी झाला. मात्र आज जवळपास 500 तरूण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा साधन म्हणून विक्रम मिनीडोअर चालवत आहेत. जर हा थांबा हलविल्यास या तरूणांना आपला व्यवसाय करणे कठीण होईल.
पेण शहराच्या मधोमध असलेल्या या जागेवर सत्ताधार्यांनी वर्क्र नजर ठेवल्याने भविष्यात या जागेवर भाजी मार्केटच्या नावाने मॉल बांधून एखाद्या बडया बिल्डरच्या घशात घालण्याचे कारस्थान असल्याचे दबक्या आवाजात पेण शहरात बोलले जात होते. मात्र नविन टी.पी.प्लॅन मध्ये सदरील जागा पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आली. त्यामुळे कळत नकळत तत्कालीन सत्ताधार्यांचे मनसुबे लयास गेले नाहीत. मात्र भूखंड क्र. 101 मध्ये बांधण्यात आलेल्या कमर्शियल इमारतीसाठी नगरपालिका हट्ट धरत आहे. नियमानुसार भाजी मार्केटच्या नावाने बांधण्यात आलेल्या कमर्शियल इमारतीला सभोवताली रस्ता ठेवणे हे गरजेचे होते. ज्यावेळेला सदरील इमारतीचे बांधकाम आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी या इमारतीच्या सभोवताली रस्ता प्रस्थापित होता, मात्र नंतरच्या काळात अस काही घडल की, या इमारतीच्या सभोवतालील रस्ता गायब झाला. व ही झालेली चुक दुरूस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासन विक्रम मिनिडोअर चालकांवर कागदी घोडे नाचवून बळजबरीने त्यांना काढू पाहत आहेत.
पेण शहरातील एस.टी.स्टँड समोरील अंतिम भूखंड क्र.100 मध्ये विक्रम-मिनीडोअर चालकांचा 1997 पासून वावर आहे. तसेच त्यावेळी तत्कालीन नगरपालिकेच्या सत्ताधार्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने या थांब्यावर लोखंडी रॅलिंग तयार केली होती. जेणेकरून विक्रम चालकांमध्ये नंबरवरून वाद होवू नये व शिस्तीने धंदा करता यावा. कारण ही जागा पेण नगररचना आराखडयामध्ये (नकाशामध्ये) टांगा, टॅक्सी स्टॅन्ड म्हणून आरक्षित आहे. जुलै 2008 ला या थांब्यावर तत्कालीन सत्ताधार्यांनी मातीचे डंम्पर खाली केले होते. परंतु, त्यावेळेला सत्ताधारी विरूध्द विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षाच्या वेळी विक्रम-मिनीडोअर, चालक-मालक संघटनेच्या वतीने आंदोलन सम्राट विष्णूभाई पाटील व नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचे दिर वैकुंठ पाटील लढले होते. त्यावेळेला त्यांनी सांगितले होते की, कायद्यानुसार ही जागा टांगा, टॅक्सी स्टॅन्ड म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे माती काढून विक्रम-मिनीडोअर वाल्यांना जागा खाली करून द्यावी व तत्कालीन प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून ही जागा खाली करून दिली होती.
विक्रम मिनीडोअर संघटना या स्टॅन्डमध्ये विस्तारीत सुधारणा करण्याच्या तयारीत असतानाच दि. 24 जुलै 2018 रोजी पेण नगरपालिकेने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांना एक पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये असे नमूद केले होते की, अंतिम भूखंड क्र.100 हा पेण नगरपालिकेच्या दुसर्या सुधारीत मंजूर विकास आरखडयामध्ये भाजी मार्केटच्या विस्तारासाठी ठेवण्यात आलेला आहे. मात्र 11 मे रोजी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये नगरपालिकेचे बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांनी सांगितले की, अंतिम भूखंड क्र.100 हा पार्किंगसाठी आरक्षित आहे. याचाच अर्थ नगरपालिका वेळोवेळी विक्रम मिनिडोअर चालक-मालक संघटनेच्या डोळयात धूळ फेक करत आहेत. हे सिध्दच होत आहे. यावेळी नगरपालिकेकडून मुख्याधिकारी जीवन पाटील बांधकाम अभियंता विनायक बनसोडे, विक्रम मिनीडोअर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, व त्यांचे सहकारी तसेच प्रांताधिकारी आणि स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या मध्ये बर्याचवेळ चर्चा झाली मात्र या चर्चेमध्ये नगरपालिकेचे अधिकारी अंतिम भुखंड क्र. 100 मधून दोन ठिकाणहून रस्ता नेण्यासाठी आग्रही दिसले. व स्वतःची चूक कबूल करण्यास तयारी दाखविली नाही त्यावेळी नगरसेवक संतोष पाटील यांनी सर्व तांत्रिक बाबी काय आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. आणि नगरपालिकेची काय चुक आहे हे ही दाखवून दिले. त्यावेळी मुख्याधिकार्यांनी नगरपालिकेची तांत्रिक चुक असल्याचे कबूल करून एकावेळी 25 गाडया उभ्या करण्याची सुविधा देण्याचे आश्वस्त केले.
परंतु विक्रम मिनीडोअरचे संघटनेच्या पदाधिकार्यांना हे मान्य नव्हते. त्यांना एका वेळी 72 गाडया उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यावर ते ठाम राहिले. त्यावर स्थानिक आमदारांनी त्यांना सांगितले की, सदरील जागा नगरपालिकेची आहे त्यावर तुमचा हक्क नाही. नगरपालिकेला हवे असेल तेच नगरपालिका करणार मात्र त्यावेळी एकच गोंधळ उडाला त्यावेळी प्रातांनी मध्यस्थी करून रस्त्यासाठी लागणार्या जागेसाठी नव्याने मोजणी करण्यासाठी आदेश दिले व या कामी पेण मंडळअधिकारी व तलाठी मदत करतील या गोष्टीवर विक्रम मिनिडोअरवाले राजी होउन दोन दिवसाच्या आत मोजणी करण्यास सांगितले. मात्र नगरपालिकेच्या प्रशासनाचा चुकीचा फटका विक्रम मिनिडोअर चालक-मालकांना बसल्याशिवाय राहणार नाही. यात काही शंकाच नाही.