प्रवाशांसह वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवाचे आगमन तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चाकरमानी गावी येण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र, अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा मार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांसह चाकरमानी व वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, काहींना अपंगत्व आले आहे. खड्ड्यांतून प्रवास करणे धोकादायक बनू लागले आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होेण्याची अपेक्षा होती. परंतु, ती अपेक्षा खोटी ठरणार असल्याचे चित्र आहे. गणरायाचे आगमन येत्या 7 सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईतून गावी येणार्या चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. एसटी बससह खासगी वाहनांमधून प्रवासी प्रवास करीत आहेत. परंतु, अलिबाग-वडखळ मार्गासह अलिबाग-रोहा मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग-पेण मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खचला असून, काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. कार्लेखिंड येथे वळणावर रस्त्याच्या दुतर्फा असलेले कठडे खराब झाले आहेत. अलिबाग-रोहा मार्गावरील पुतबाईचापाडा ते कुंठ्याची गोठी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. येथील रस्त्याचा काही भाग खचल्याने भला मोठा भगदाड पडला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती तात्पुरता केली जात असली, तरीही खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खड्ड्यांमुळे वाहने रस्त्यात बंद पडणे, खड्डे चुकविताना अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.