। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
महानगरपालिकेने रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी 40 महिन्यात तब्बल 40 कोटी 58 लाख 41 हजार 257 रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कोळवणकर यांनी ही माहिती दिली. हा खर्च खड्ड्यांसाठी केला आहे की ठेकेदारासाठी असा प्रश्न दीपक कोळवणकर यांनी केला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. 40 कोटी खर्च करून देखील बहुतांशी रस्ते खड्ड्यातच आहेत. त्यामुळे हा खर्च पाण्यात गेला असल्याचे बोलले जात आहे. या पैशातून ठेकेदाराचे चांगभलं झालं असल्याचा आरोप केला जात आहे. एक एप्रिल 2021 ते 31 जुलै 2024 पर्यंत पनवेल महानगरपालिकेने पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी 40 कोटी 58 लाख 41 हजार 257 रुपये खर्च केले आहेत. एक एप्रिल 2021 ते 31 जुलै 2022 पर्यंत पाच कोटी 69 लाख 37 हजार 605 रुपये खड्ड्यांवर खर्च केले. तर एक ऑगस्ट 2022 ते एक एप्रिल 2023 पर्यंत खड्ड्यांवर 16 कोटी नऊ लाख 96 हजार 373 रुपये खर्च करण्यात आले. 2 एप्रिल 2023 ते 31 जुलै 2024 पर्यंत सर्वाधिक 18 कोटी 19 लाख 7 हजार 269 रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांच्या कररुपी पैशाची खड्ड्यांवर आणि ठेकेदारावर उधळण केली असल्याचे बोलले जात आहे.
पनवेल महापालिका हद्दीत खारघर, नवीन पनवेल, कामोठे, पनवेल आदी परिसरात रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. एप्रिल 2023 ते जुलै 2024 पर्यंत खारघरमध्ये सर्वाधिक सहा कोटी 71 लाख 76 हजार रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. याच 15 महिन्यात पनवेलमध्ये 4 कोटी, 27 लाख, 30 हजार रुपये, नवीन पनवेलमध्ये 2 कोटी 5 लाख 96 हजार रुपये, कामोठेत 2 कोटी 37 लाख 96 हजार रुपये तर कळंबोलीत 3 कोटी, 36 लाख 6 हजार रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. तरीदेखील येथील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजवले नसल्याचा आरोप केला जात आहे.