कोर्टाच्या अवमान प्रकरणी पोलिसांची कारवाई
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण येथील गुटखा विक्रेता शहजाद सरवरअली शेख उर्फ गुड्डू याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी अलिबाग पोलिसांनी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर गुटखा किंग गुड्डूला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील गुटखा किंग म्हणून ओळख असलेल्या पेण येथील गुड्डूला गुटखा विक्री प्रकरणी सप्टेंबर 2019 मध्ये अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. या बाबत अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु आहे. कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे गुटखा किंग गुड्डू विरोधात अलिबाग जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार सोमवारी रात्री अलिबाग पोलिसांनी पेण येथून गुटखा किंग गुड्डूला अटक केली आहे. या प्रकरणी त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.