पेण पालिका मैदान चिखलमय

देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| पेण | प्रतिनिधी |

पेण नगरपालिका मैदानावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून पाण्याच्या अती वापरामुळे मैदानावर उन्हाळयातही चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे खेळाडूंसह व मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंना पाय घसरून दुखापत होण्याची भिती व्यक्त केली जात असल्याने पेण नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पेण नगरपालिकेचे हे मैदान नागरीकांसाठी, खेळाडूंसाठी वरदान आहे. अनेक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी खेळविल्या जातात. तसेच सरावासाठी धावणे व क्रिकेट खेळ आवडीने खेळले जात असतात. मात्र सदर मैदानाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून गेली अनेक दिवसांपासून मैदानावर पाणी शिपण्यासाठी ठेवलेल्या फवार्‍यातून रात्र दिवस पाणी चालूच राहिल्याने मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे एखादा धावपट्टू तसेच क्रिकेट खेळाडूंना सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पानवट जागेवर कावळे मैदानावरील गवत उपटून खाद्य शोधत असल्याने मैदानाला विदृप स्वरूप आल्याचे पहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे पॅव्हेलीयनमध्ये रोज दारूच्या बाटल्यांचा कचरा पहायला मिळत आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देउन नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी खेळाडू व ज्येष्ट नागरीकांकडून केली जात आहे. या विषया करता पेण नगरपालिकेचे ओएस राजाराम नरूटे यांना भ्रमन्ती ध्वनी वरून संपर्क केले असता त्यांनी सांगितले की 5 मिनिटात फोन करून सांगतो. परंतु त्यांचा फोन काही आला नाही. नंतर आम्ही पुन्हा पुन्हा त्यांना फोन केला असता त्यांनी फोन काही उचला नाही.

Exit mobile version