पेणच्या मुद्रांक विक्रेत्याला अटक; प्रकरण आले अंगाशी

| पेण | प्रतिनिधी |
पेण पोलीस ठाण्यात पुनम शंभुनाथ गुप्ता या अपंग महिलेने आपल्या राहत्या घरावर चुकीचा मृत्युपत्राच्या आधारे नाव चढविल्याची तक्रार आपली भावजय गीता गुप्ता हिच्या विरुध्द 7 जुलै रोजी केली हेाती. यामध्ये गीता गुप्ता हिला पोलीसांनी अटक करुन मृत्युपत्राबाबत कसुन माहिती घेतली. यावेळी एकाच मालमत्तेसाठी दोन मृत्युपत्र तयार झाले असून ते दोन्ही मृत्युपत्र हबीब खोत यांनी तयार केल्याचे समोर आले. त्यातील एक मृत्युपत्र जे खरे आहे ते 21 सप्टेंबर 2020 ला नोंदणीकृत मृत्युपत्र केले. तर दुसरे मृत्युपत्र नोटरीव्दारे 15 फेब्रुवारी 2021 रोजी अंधेरी येथे करण्यात आले.

हे मृत्युपत्र खोटे व चुकीचे होते म्हणूनच चुकीचे मृत्युपत्र करण्यासाठी गीता गुप्ता यांच्याविरुध्द पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हामध्ये सह आरोपी म्हणून मुद्रांक विक्रेते हबीब खोत यांना काल उशीरा पेण पोलीस ठाण्यात अटक केली आहे.

हबीब खोत यांना अटक झाल्याची बातमी पेण शहराच्या नाक्यानाक्यावर चर्चेत होती. याविषयी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदर गुन्हयामध्ये हबीब खोत यांचा सहभाग आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.

हबीब खोत हे मुद्रांक विक्रेते असल्याने नायब तहसीलदार नितेश परेदशी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हबीब खोत यांचा रिपोर्ट वरीष्ठांना पाठविण्यात आला आहे. त्यावर योग्य ती कारवाई होईल तर चुकीचा मृत्युपत्र दाखवून नगरपालिकेत असेसमेंट सदरी नाव नोंदल्याबाबत मुख्याधिकारी जीवन पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट देउन माझी दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून खुलासा मागितला आहे व असेसमेंट सदरी झालेली चुक दुरुस्त करुन रिपार्ट जसेच्या तसे केले आहेत. एकंदरीत एका खोटया मुत्युपत्रामुळे पोलीस प्रशासन, तहसीलदार, कोषाग्रह, नगरपालिका हे चारही विभाग कामाला लागले आहेत.

हबीब खोत कोण आहेत?
हबीब खोत हे माजी नगरसेवक असून हे मुद्रांक विक्रेते आहेत. तसेच मागच्याच पंधरा दिवसापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडणी मागितली म्हणून त्यांना पकडून देणारी व्यक्ती म्हणजेच हबीब खोत. तसेच गेल्या महिन्यापूर्वी सेतूमध्ये जास्त पैसे घेतात, अशी जी ओरड होती. त्याच्यातही हबीब खोत यांचेच नाव पुढे येत होते.

Exit mobile version