ठेवीदारही कमालीचे नाराज
। पेण । प्रतिनिधी ।
एक तपाहून अधिक काळ बुडित निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पेण दौरा फुसका बारच ठरला. ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन न देता केवळ अधिकार्यांवर नौटंकीची आगपाखड करीत त्यांनी आपला दौरा आटोपता घेतला. त्यांचा हा दौरा म्हणजे ठेवीदारांना वेडे बनविण्याचा प्रकार असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. या दौर्याचा आगामी काळात भाजपला किती फायदा होणार हे काळच ठरविल, अशी चर्चा पेणमध्ये सुरु झाली आहे. ठेवीदारांनीही सोमय्यांचा दौरा म्हणजे शिळ्या कढीला ऊत अशी टीका केली आहे.
अर्बन बँक बुडीत निघाल्यापासून आजतागायत राजकीय नेतेमंडळींनी फक्त आश्वासनेच दिली.त्यात सोमय्यांची भर पडली अशी टीका होऊ लागली आहे. सोमय्यांनी या दौर्यात आपण कसे इतरांपेक्षा ग्रेट आहोत हे दाखविण्याचे केविलवाणा प्रयत्न केला.या दौर्यापासून प्रसारमाध्यमांना मुद्दाम दूर ठेवण्यात आले होते.मात्र उपलब्ध माहितीनुसार सोमय्यांनी बँक तसेच महसूल,पोलीस अधिकार्यांना अपमानित केल्याचे बोलले जाते.मात्र त्याचवेळी दौर्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधाभास होतील अशी वक्तव्ये केली. त्यातले पहिले वक्तव्य म्हणजे गेली 12 वर्षात संघर्ष समितीकडून पत्रव्यवहार झाला नाही. दुसरी बाब म्हणजे 2022 ला जो अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाच्या सहाय्याने बँक व्यवहार बंद झाल्यानंतर 90 दिवसात 5 लाख पर्यंतचे पैसे खातेदारांच्या खात्यावर जमा होतील. परंतु हा नियम पेण अर्बन बँकेला बंधनकारक नाही. आणि शेवटी पुन्हा त्यांनी 1 लाख पर्यंतच पैसे मिळतील असे ही वक्तव्य केले.
महत्वाची बाब म्हणजे किरीट सोमैया त्यांची आजची भेट ही फक्त आणि फक्त राजकीय उद्देशाने असल्याची चर्चा पेण अर्बन बँकेच्या कार्यालयाच्या परिसरात रंगत होती. तसेच सोमैया यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तर देण्यापेक्षा मी सांगतोय तेवढेच ऐका अशीच भूमीका घेतली. तसेच त्यांनी भाजपचे आ.रविशेठ पाटील हे ठेवीदारांचे पैसे मिळविण्यासाठी सहकार मंत्रालयात बैठक लावणार असल्याचे देखील न विसरता आवर्जून सांगितले.
बँकेच्या प्रॉपर्टीवरील हक्क ईडी सोडणार असून,याबाबत बँकेच्यावतीनेही न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. जे छोटे ठेवीदार आहेत त्यांना नवीन नियमामुळे निर्बंध सुरू झाल्यापासून 90 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. त्याच्यामुळे मोठया ठेवीदारांचे काहीच नुकसान नाही होणार असे 179 कोटी रुपये हे पेण बँकेला एक अॅक्सेपशन म्हणून प्राप्त करून द्यावी, . त्यासाठी रिझर्व्ह बॅक, मोदी सरकार आणि सहकार मंत्रालयाच्या वाटाघाटी चालू आहेत.
ज्या प्रॉपटी जप्त करण्यात आल्या त्या पैकी काही प्रॉपर्टी बाहेरच्या बाहेर विकल्या जातात, भाडयाने दिले जातात. त्याची चर्चा झाली या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या यादी तयार करण्याचा निर्णय झालेला आहे. पुढच्या काही दिवसात सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा बैठक होणार जे 179 कोटी प्राप्त झाले तर 1 लाख 65 पैकी जवळजवळ 1 लाख 60 हजार गुंतवणूक दारांना त्यांचे सगळे पैसे परत मिळू शकतात. उरलेले जे 100 एक कोटी रुपये प्रॉपर्टी ताब्यात आहे ती विकून 1 लाखांच्या वरच्या गुंतवणूक दारांना देण्याचा प्रयत्न आहे. असे सोमय्या यांनी सांगितले.
कृषीवलच्या वृत्ताची दखल
सोमय्यांच्या दौर्यावरुन कृषीवलमध्ये 13 नोव्हेंबर 2022 च्या अंकात किरीट सोमैया राजकीय हेतुने पेण अर्बन बँकेला भेट देत आहेत. अशा प्रकारचे वृत्त प्रसिध्द झाले होते आणि त्यामध्ये सविस्तर बँकेबाबत लिहिले होते. ही बाब किरीट सोमैया यांना चांगलीच झोंबली.
ठेवीदारांना वेडे बनवण्याचा प्रकार
पेण अर्बन बँकेमध्ये मेहनतीचे 35 लाख रुपये अडकून पडलेल्या आर.डी.पाटील या ज्येष्ठ ठेवीदाराने कृषीवलशी बोलताना सांगितले की, आजपर्यंत तीन मुख्यमंत्र्यांनी ठेविदारांना आश्वासन देउन वेडे केलेत. आणि आज किरीट सोमैया हे देखील आम्हाला वेडे करायलाच आले आहेत. किरीट सोमैया ना आमदार आहेत ना खासदार आहेत.ईडी चे अधिकारी यांचे का ऐकतील. शब्दांचे खेळ करून आमच्या भावनांशी खेळू नका आमच्या ठेवी आम्हाला परत करा एवढीच अपेक्षा. पेणची जनता आश्वासनाला कंटाळली आहे. वेडे बनवण्याचे प्रकार थांबवा, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.