611 कोटींची वसुलीचे गौडबंगाल; ठेविदार अजूनही वार्यावर
| पेण | मुस्कान खान |
75 वर्षाची परंपरा असलेल्या अर्बन बॅक घोटाळयाला एक तप होऊन गेले आहे. या बारा वर्षात बँकेकडून आजतागायत 184.71 कोटींची वसुली झाली आहे. तर 611.15 कोटी रूपये वसुली होणे बाकी आहे. यातील बोगस प्रकरणाचा थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे ठेविदारांची देणी काही परत देता येत नाही, अशी सर्व स्थिती असल्याची माहीती बॅकेच्या प्रशासकांकडून प्राप्त झाली आहे.
राज्यातील चार-चार मुख्यमंत्र्यांनी अर्बन बँक सुरू होण्याचे गाजर दाखवले. परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. संचालकांना अटक झाली. यातील काही संचालकांनी विनाकारण बँकेचा त्रास झाल्याने हाय खाल्ली. त्या त्रासातच काही जणांना आपला अनमोल जीव गमवावा लागला. तर काहीजण आज पेणच्या राजकारणात सक्रिय झालेल पहायला मिळतात. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ या थाटात संचालक मंडळ वावरत आहेत. मात्र या सर्वात आजही ठेविदार अजून वार्यावर आहेत.
3 सप्टेंबर 1935 साली स्थापना झालेल्या पेण अर्बन बँकेचा सन 23 सप्टेंबर 2010 साली जेव्हा बँक आर्थिक घोटाळयात सापडली असल्याचे उघडकीस आले तेव्हा प्रथम दर्शनी 11.00 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले. परंतु जसजसे एक-एक पान उघडत गेले तसतसा घोटाळयांचा आकडा निश्चित होत गेला. तो नंतर 795.86 कोटी रूपयांचा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 चे कलम 35 ‘अ’ अन्वये आर्थिक निर्बध लागू झाले. त्यानंतर 24 सप्टेंबर 2010 रोजी तातडीने पेण अर्बन बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. मात्र या बँकेच्या भ्रष्टाचाराच्या घटनेनंतर आजपर्यत 13 वर्षे झाली पण बँक सुरू झाली नाहीच. तसेच बँकेच्या खातेदारांना व ठेवीदारांना त्यांची भरलेली रक्कमही मिळाली नाही.
वसुली संथगतीने
बँकेच्या कागदोपत्री 795.86 कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे, असे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र 49.96 कोटी रुपयांचे कागदोपत्री कर्जदार असून बोगस कर्जदार ज्यांचे कोणतेही कागदपत्र नाहीत असे 745.90 कोटी रुपयांचे खोटे कर्जदारांच्या नावे कर्ज वाटप झाले आहे. तर बँकेची कर्ज वसुली मोहीम अतिशय संथगतीने सुरू असून आजतागायत 184.71 कोटींचीच वसूली झाली आहे. तर 611.15 कोटी रूपये वसूली होणे बाकी आहे.
बारा कोटींच्या ठेवी परत
1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 अखेर पेण अर्बन बँकेने कर्जदारांना एक रक्कमी परतफेड योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 227 अर्जातून 2.74 कोटी रूपयांची वसुली केली आहे. बॅकेतील ठेवीदारांपैकी उच्च न्यायालयाच्या 20 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार आजपर्यत 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम असणार्या सर्व शाखांमधून 13 हजार 723 ठेविदारांना 4 कोटी 95 लाख 8 हजार 211 रूपये तर, 25 हजार रूपयांपर्यतच्या 9 हजार 632 ठेवीदरांना 12 कोटी 16 लाख 80 हजार 360 रुपयांपर्यत रक्कमा परत मिळाल्या आहेत.
18 शाखा असणा़र्या बँकेला रातोरात टाळे बसले. यामुळे सहकार क्षेत्राला मोठा हादरा बसला होता. ठेविदार व खातेदार आपले पैसे कधी मिळतील या आशेवर अजुनही आहेत. तेव्हापासून आजतागायत दोन लोकसभा, दोन विधानसभा, दोन वेळा नगरपालिका अशा निवडणुका झाल्या. प्रत्येक वेळी राजकीय मंडळीने आपली पोळी भाजपण्यासाठी आश्वासनाची खैरात केली. शरद पवार, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी बँक सुरू करण्यासाठी आश्वासन दिले. परंतु ते आश्वासनच राहिले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी देखील आश्वासन दिले, त्यांना देखील पूर्तता करता आली नाही. आज चातक पक्ष्याप्रमाणे ठेविदार बँकेच्या मालमत्तेची कधी विक्री होते व कधी आम्हाला आमच्या हक्काचे पैसे परत मिळतात याकडे डोळे लावून बसले आहेत.