रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला ‘ब्रेक’

16 दिवसांत 1 कोटीचा दंड वसूल; ठाणे वाहतूक विभागाची कारवाई

| ठाणे | प्रतिनिधी |

ठाणे शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्तपणे रिक्षाचालकांविरोधात ठाणे वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे आणि अन्य नियमांचा भंग केल्याबद्दल रिक्षाचालकांकडून 16 दिवसांत तब्बल 1 कोटी 14 लाख 76 हजारांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान 7 हजार 252 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने वाहतूक विभागाने ठाण्यातील रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला ब्रेक लावला आहे.

बॅच नाही, योग्य गणवेश नाही, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वागणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा विविध तक्रारी ठाणे वाहतूक विभाग हद्दीतील रिक्षाचालकांविरुद्ध होत असतात. त्यानुसार ठाणे वाहतूक विभागाने शहरातील बेशिस्त व मुजोर रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत रिक्षा चालकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अशा रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

1 जून ते 16 जून दरम्यान रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ लाख 39 हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. तर 10 कोटी 11 लाखांची वसुली बाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

कारवाई सुरूच राहणार
डोंबिवली शहरातही गेल्या पाच महिन्यांत 5 हजार 15 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 49 लाख 97 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती डोंबिवली शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.
रिक्षाचालक संतप्त
भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून शहरातील रिक्षाचालकांवर दंड आकारणी केली जात असल्याने रिक्षाचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओहोळ यांच्या कार्यालयाबाहेर संतप्त निदर्शने केली. जे रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर करावी व्हावी. मात्र अन्यायकारक वसुली करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
Exit mobile version