दहा दिवसांत 42 लाख रुपयांचा दंड वसूल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हजार 27 चालकांना दणका मिळाला आहे. बेशिस्त चालकांविरोधात कारवाई करीत जिल्हा वाहतूक शाखेने दंडातून लाखोची वसूली केली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये 42 लाख 31 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नियम मोडणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न देखील या दंडात्मक कारवाईतून करण्यात आला आहे.
रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित 28 पोलीस ठाणे आहेत. त्यात 11 पोलीस ठाणे सागरी आहेत. जिल्ह्यामध्ये साधारणतः अडीच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामध्ये जिल्हा वाहतूक शाखेमध्ये साधारणतः 80हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. जिल्ह्यात वाढते पर्यटन व औद्योगिकीकरणामुळे वाहनांची संख्याही प्रचंड वाढू लागली आहे. दुचाकी वाहने वर्षाला 25 हजारहून अधिक नोंदणी केली जात आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांची संख्याची वाढही दिवसेंदिवस होत आहे. तरी अनेक जण वाहतूकीच्या नियमांचे पालन करीत नाही. वाहन वेगात चालविणे, ट्रीपल शीट असणे, क्षमतेपक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, अशा अनेक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविले जातात. त्यामुळे अपघात होण्याची भिती अधिक असते. तसेच, गंभीर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व येते. तर, काहींना जीव देखील गमवावा लागतो.
हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अपघाताबरोबरच मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून शाळा, महाविद्यालयांमध्ये शिबीराच्या मार्फत जनजागृती केली जाते. रस्त्यांवर ठिकठिकाणी जनजागृती फलक लावले जातात. तरीदेखील काही चालक वाहन बेफिकरपणे चालवून अपघाताला बळी पडतात. बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून नियमीत कारवाई केली जाते. त्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गासह नाक्यानाक्यावर वाहतूक पोलीस तैनात करून चालकांविरोधात कारवाई केली जाते. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून गेल्या 10 दिवसांत 4 हजार 27 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 42 लाख 31 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये दि.16 जूनला 531 जणांविरोधात कारवाई करून 5 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल दि.13 व 14 जून रोजी 403 आणि 479 जणांविरोधात कारवाई केली आहे. इतर दिवसांमध्ये 302 पासून 378 जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून लाखोचा दंड वसूल करण्यात आले आहे. दरम्यान, दर दिवशी 2 लाखांपासून 5 लाखापर्यंत दंड वसूल करण्यास जिल्हा वाहतूक शाखेला यश आले आहे.







