मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव; निधी मंजूर होऊनही काम ठप्प
| महाड | प्रतिनिधी |
कोकण रेल्वे मार्गावरील महाड तालुक्यातील सापे-वामने रेल्वे स्थानकाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणाहून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या स्थानकावर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या स्थानकाच्या विकासाठी सुमारे 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. परंतु, असे असतानाही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांसह प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.

महाड तालुक्यातील वीर, सापे-वामने, करंजाडी आणि विन्हेरे ही कोकण रेल्वेवरील महत्त्वाची स्थानके आहेत. त्यापैकी सापे-वामने स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या स्थानकावर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. स्थानकावरील फलाटावर केवळ मर्यादित भागातच छप्पर उपलब्ध असून, उर्वरित ठिकाणी प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहावे लागते. संपूर्ण फलाटावर संरक्षक छप्पर उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याशिवाय स्थानक परिसरातील अपुरी प्रकाश व्यवस्था, वाढलेले गवत आणि साप-विंचवांचा वाढता वावर यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उपमुख्य अभियंता (कार्य), रत्नागिरी कार्यालयाने स्थानकाच्या उन्नतीकरणासाठी आणि फलाटाचे उच्चस्तरीय प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. या कामासाठी 6 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून, मार्च 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने 31 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्म उंचीकरणाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र या कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजी कायम आहे.
तसेच, या स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी इतर अनेक समस्या कायम आहेत. स्थानकाकडे जाणारा नवीन रस्ता नुकताच तयार करण्यात आला असला, तरी त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. पावसाळ्यात हा रस्ता खचण्याची अथवा चिखलमय होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, स्थानकावरील फूड स्टॉल दीर्घकाळापासून बंद असल्याने प्रवाशांना खाण्यापिण्याची गैरसोय सहन करावी लागत आहे. हा स्टॉल पुन्हा सुरू करून स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. स्थानिकांच्या मते, सापे-वामने स्थानकाची भौगोलिक रचना आणि भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या स्थानकाला जंक्शन म्हणून विकसित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मंजूर निधीचा तातडीने विनियोग करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, तसेच अतिरिक्त निधीसाठी लोकप्रतिनिधींनी यात वैयक्तिक रित्या लक्ष घालून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.
स्थानकाची सद्यस्थिती
फलाटावर अपुरे छप्पर असल्यामुळे ऊन-पावसात प्रवाशांची गैरसोय होते. अपुरी प्रकाश व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, या ठिकाणी साप-विंचवांचा वावर वाढल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर स्थानकातील फूड स्टॉल बंद असल्यामुळे प्रवाशांना खाण्यापिण्याची सुविधा मिळत नाही. तसेच, स्थानकापर्यंत जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या नवीन रस्त्याच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खराब होण्याची भीती प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. दरम्यान, या स्थानकासाठी सुमारे 1.25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, तरीही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही.
सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन आणि मार्च 2027 ची मुदत समोर असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. मंजूर निधी स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा आहे का, याचाही विचार होणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त निधीची तरतूद करून विकासकामे गतीने पूर्ण करावीत.
स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी संघटना
मागील सहा महिने मी स्थानकावरील कॅन्टीन चालवत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता स्थानकावरील प्रवासी संख्या वाढत असून, लवकरच पुन्हा सेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे.
अर्पिता बैकर,
कॅन्टीन चालक







