विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा जीव धोक्यात
। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे या मार्गावर अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्गाचे काम अद्याप पूर्ण क्षमतेने न झाल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे.
पनवेल ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा पहिला टप्पा सुप्रीम इन्फ्रा व महावीर या ठेकेदारांना देण्यात आला होता. मात्र, हा टप्पा वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर अनेक ठेकेदारांनी टप्प्याटप्प्याने काम पुढे नेले असले तरी महामार्गालगतच्या गावांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी सब-वे व ओव्हरब्रिज उभारण्यात आले आहेत. मात्र, गावांच्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक असलेले गतिरोधक बसविण्यात आले नसल्याने ग्रामस्थ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे बापुसाहेब देशपांडे विद्या संकुल तसेच आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आहेत. येथे बालवाडीपासून ते सायन्स, कॉमर्स व आर्ट्स महाविद्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 60 ते 70 शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना छोटी गावे, आदिवासी वाड्या असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. दूध विक्रीसाठी जाणारे शेतकरी, पादचारी तसेच विद्यार्थी यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर वाळूचे डंपर, अवजड वाहने व मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागोठणे येथील शाळा व महाविद्यालय परिसरात दोन्ही बाजूंना तातडीने गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी पालक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
जीव मुठीत घेऊन प्रवास
महामार्गावर ओव्हरब्रिजची सुविधा असली तरी शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर शेकडो विद्यार्थी वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करून थेट महामार्ग ओलांडताना दिसतात. दुचाकीस्वार आणि पादचारी देखील जीव धोक्यात घालून रस्ता पार करत असल्याने येथे तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.







