बाप्पांना हवे मानांकन; चैन्नईच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील पेण हे गणपती मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो मूर्तींची निर्यात महाराष्ट्रासह देशभर केली जाते. लहान मूर्तीपासून मोठ्या आकाराच्या हजारो मूर्तींना सातासमुद्रापारही मोठी माणगी आहे. दरम्यान, पेणच्या मूर्ती असल्याचे भासवत अनेक ठिकाणी मूर्ती विकल्या जातात. त्यामुळे पेणच्या बाप्पांना जीआय मानांकन मिळावे, अशी विनंती ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, पाठपुरावा सुरू आहे. लवकर मानांकन मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे स्वतःची खास ओळख असणारे पेणचे गणपती सातासमुद्रापल्याड पोहोचले आहेत. पेणमधील हमरापूर, जोहे या गावांमध्ये घराघरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. आता हा व्यवसाय परिसरातील गावांमध्ये तसेच पेण शहरातही विस्तार करु लागला आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस आणि पितृपक्षातील 15 दिवस सोडले तर वर्षभर त्या ठिकाणी मूर्ती बनवण्याचे काम चालते. पेणमध्ये सुमारे 450 मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत.

साचे, मातीकाम, आखणी, आकार, आसन, अलंकार, डोळे कोरणी, हातातील आयुधे, बैठकीचे आसन-सिंहासन, महिराप तसेच बालमूर्तींपासून सार्वजनिक मूर्तींपर्यंतची विविध आकारातील मांडणी हे या पेणचे वैशिष्ट्य होय. कसबी कारागीर आणि नैसर्गिक वाटावे असे रंगकाम या सार्‍यांमुळे पेणच्या मूर्ती या महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे प्रतीक मानल्या जातात.

फसवणूक टाळ्यासाठी उपाय
पेणमधून दरवर्षी सुमारे 32 लाख गणेशमूर्ती देश-विदेशात पाठविल्या जातात. यातून जवळपास 70 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. याचा गैरफायदा घेतला जात आहे. इतर ठिकाणी बनविलेल्या मूर्तीदखील पेण येथील मूर्ती असल्याचे सांगून फसवणूक केली जाते. ही फसवणूक टाळण्यासाठी तसेच पेण येथील मूर्तींना वेगळी ओळख मिळून देण्यासाठी जीआय मानांकन मिळवण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

पेण येथील गणेशमूर्तींना वेगळी ओळख मिळावी यासाठी त्यांचा जीआय मानांकन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर येथील मूर्तींना आपली वेगळी ओळख प्राप्त होईल.

गु.श. हरळय्या,महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड
Exit mobile version