खालापूरकर शेकापला विजयी करुन विरोधकांना चपराक देतील

जिल्हासहचिटणीस किशोर पाटील यांचे प्रतिपादन
। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
खालापूर नगर पंचायतीच्या हद्दीत संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असतानाही विकासकामे झालीच नाहीत अशी बोंब मारणार्‍या विरोधकांना सुज्ञ खालापूरकर शेकापला विजयी करुन मतदान करून चोख उत्तर देतील असे प्रतिपादन जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील यांनी केले आहे. शिवसेना नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकांवर त्यांनी पलटवार केला आहे.
खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. शेकापक्षाच्या विरोधात शिवसेनेने दोन्ही तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरवली आहे. आ. महेंद्र थोरवे जातीने प्रचारात उतरले आहेत. शेकापवर भ्रष्टाचार आणि कामे झाली नसल्याचा आरोप केला जातोय.
याच निराधार टीकांना चोख प्रत्त्युतर देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रचारात उतरले असू्न शेवटच्या टोकापर्यंत पोहचून पक्षाकडून करण्यात येणार्‍या विकासकामांचा अजंठा पोहचविण्यासाठी शेकापक्षाचे जिल्हासहचिटणीस किशोर पाटील, तालुका चिटणीस संदीप पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, मधुकर शिंदे वाडयावस्त्यावर फिरत आहेत.
यादरम्यान किशोर पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना म्हणाले की,प्रतिकूल परिस्थितीत नगरपंचायतीची स्थापना झाल्यावर संतोष जंगम यांनी निधी उपलब्ध करीत नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी पाच वर्षात खालापूरचा विकास केला आहे.त्यामुळे 100 टक्के मतदार शेकापक्षाच्या मागे उभे आहेत.
तसेच कुठलाही विकास सहा महिन्यात होत नसतो. मात्र तरीही विकासकामे झालीच नाहीत अशी बोंब मारणार्‍या विरोधकांना सुज्ञ खालापुरकर शेकापला भरभरून मतदान करून चोख उत्तर देतील असा पलटवार किशोर पाटील यांनी करीत खालापूरची जनता विकासाच्या सोबत राहील, कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नसल्यामुळे शेकपक्षाची सत्ता येईल असा विश्‍वासही किशोर पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version