आम.जयंत पाटील यांचे प्रतिपादन, खोपोलीत कार्यकर्त्यांचा मेळावा
खोपोली | संतोषी म्हात्रे |
रायगडात शेकापला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला राजकारण करता आलेले नाही आणि करताही येणार नाही, असे ठोस प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रविवारी (18 ऑक्टोबर) खोपोली येथे केले.
शेकापच्यावतीने खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या खालापूर तालुका शेकाप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी घणाघाती भाषण करुन कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण केला.निवडणुकीसाठी तयारीला लागा,असा आदेशच त्यांनी उपस्थितांना दिला.
या मेळाव्यास माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, पनवेल मनपा विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, खालापूर सभापती वृषाली पाटील, जिल्हा सहचिटणीस किशोर बाळकृष्ण पाटील, तालुका चिटणीस संदीप तातुराम पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, शहर सहचिटणीस कैलास गायकवाड, खालापूर शहर चिटणीस आकेश जोशी, खालापूर युवक अध्यक्ष प्रसाद तावडे, खोपोली शहर युवक अध्यक्ष मनोज माने, मोहपाडा येथील ज्येष्ठ नेते सुभाष अहिर, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक नासीर पटेल, नगरसेवक दिलीप जाधव, शीळफाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश अभाणी, खाता शिप्र मंडळाचे पदाधिकारी दिलीप पोरवाल, दिनेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका विषद केली. विचारातून व बांधिलकीतून काम हे पक्षाचे धोरण असून कोण कोणाबरोबर येतो आणि जातो असे सध्याचे राजकीय वातावरण आहे.पण अशा या वातावरणात शेकाप जनतेबरोबर असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
शेकापच नंबर वन
जिल्ह्यात शेकाप पहिल्या क्रमांकावर असून, शेकापकडे साडे चार लाख मते आजसुध्दा कायम असल्याची वस्तुस्थिती त्यांनी आकडेवारीनिशी मांडली. सध्याचे राजकारण बदलेले आहे. आपली तयारी झाली असून आगामी काळात होणार्या निवडणुकीसाठी वातावरण तयार केले आहे,असे आश्वासक उद्गार त्यांनी काढले.
नगर परिषदेत आधीच्या निवडणुकीत पक्षाला 11 जागा देणार्या या शहराने नंतरच्या निवडणुकीत 3 जागांवर आणले असे सांगून त्यांनी बाबूमामा जाधव यांची आठवण करून दिली. शहरात 40 टक्के दलितांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. त्यांचे व झोपडपट्टयांचे प्रश्न आपण सातत्याने मांडत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पाठिंब्यावर आलेल्या नगराध्यक्षांनी दलितांसाठी काही केले नाही पण आपण आपल्या आमदारकीची तीन वर्ष त्यासाठी देणार आहोत असे स्पष्ट केले. खाताशिप्र मंडळाला नवसंजीवनी देऊन शाळा वाचवल्या याचे स्मरण त्यांनी करून दिले. खालापूर नगर पंचायतीत काम करताना शिवानी जंगम यांनी खालापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला त्याच प्रमाणे खोपोलीत एक हाती सत्ता मिळाल्यास खोपोली शहराचा कायापालट करणार असा विश्वास त्यांनी जाहीर केला.
आजचा मेळावा ही कलाटणी देणारी बैठक असल्याचे सांगून त्यांनी महिलांच्या उपस्थितीचे कौतुक केले. पनवेल-उरणचा मतदार शेकापसोबत. पक्षाचे लोकांशी कौटुंबिक नाते असून ते 50 वर्षांपासून आहे असे ते म्हणाले.
केडरचा विचार करता शेकाप हा एकमेव पक्ष असून, आम्ही कायम जनतेसोबत आहोत. आपण शब्द पाळतो, शब्द मागे घेत नाही व पाठीत खंजीर खुपसत नाही
आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस
मुस्लिम, दलित, व्यापारी आदींसोबत शेकाप असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी पत्रकारांचेही कौतुक केले. कोरोना रुग्णालयाच्या उभारणीचे मोठे काम झाल्याचे सांगून तालुक्यातील विकासासाठी बीएल पाटील, तन्ना शेठ यांच्या योगदानाचे स्मरण करुन दिले. खालापूर शहरात आदिवासी शेकापसोबत आहे असे सांगून त्यांनी शिवानी जंगम यांच्या नेतृत्वाला तोड नाही असा अभिप्राय दिला.
खोपोली ही उद्याची मुंबई हे आपण थांबवू शकत नाही पण स्थानिकांच्या प्रश्नाची, शोषण होणार्यांना केंद्रबिंदू मानून त्यांची सोडवणूक हाच मार्ग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मी आशावादी आहे असे सांगून त्यांनी उद्याचे चित्र बदललेलं असेल अशी भावना व्यक्त केली.