दीड दमडीच्या लोकांनी शेकापची बदनामी करू नये

तालुका चिटणीसांचा इशारा
तळा | वार्ताहर |
दीड दमडीच्या लोकांनी शेकापची बदनामी करू नये शेकापचे राजकारण बघायचे असेल तर कधीही राजकीय मैदानात या असा इशारा शेकाप तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड यांनी सरपंच निकिता गायकवाड व काँग्रेस तालुका अध्यक्ष खेळू वाजे यांना दिला.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की खांबवली आदिवासी वाडी येथील ऋतिक यशवंत हिलम हा मुलगा शेणवली येथे विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडला होता.त्यावेळी शेकाप तालुका चिटणीस म्हणून मी स्वतः सर्वप्रथम त्याठिकाणी पोहचून महावितरण, तहसील व पोलीस प्रशासनाला संबंधित घटनेची माहिती दिली तसेच स्वतः मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसोबत माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन आक्रमक भूमिका घेत नुकसान भरपाई ची मागणी केली.आम्ही केलेल्या मागणीला यश येऊन महावितरण प्रशासनाने मृत मुलाच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर केली. त्यातील अतितातडीची मदत म्हणून 20 हजार रुपये व गाडी खर्च 2 हजार असे 22हजार रोख रक्कम दिली.तसेच उर्वरित 3लाख 78 हजार रुपये कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर देण्यात येणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे. आणि हे सर्व तालुका चिटणीस म्हणुन आम्ही घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच शक्य झाले.परंतु सरपंच निकिता गायकवाड आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष खेळू वाजे यांना मी केलेल्या चांगल्या कामावर नेहमी टीका करणे माहीत आहे.गावच्या प्रथम नागरिक असलेल्या सरपंच निकिता गायकवाड या त्या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्या. त्यामुळेच ते माझी व शेतकरी कामगार पक्षाची नाहक बदनामी करीत आहेत.परंतु शेतकरी कामगार पक्ष अशा बदनामीला भीक घालत नसून वेळप्रसंगी अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही धनराज गायकवाड यांनी विरोधकांना दिला.

Exit mobile version