घरबसल्या मिळणार शिकाऊ लायसन्स


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन
। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिकाऊ लायसन्सची (अनुज्ञप्ती) परीक्षा देण्यासाठी आता वाहनचालकाला आरटीओत येण्याची गरज लागणार नाही. घरातूनच ही परीक्षा परिवहनच्या संकेतस्थळावरून देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक जोडावा लागणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. या नवीन सुविधेचे तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

परीक्षार्थीना शिकाऊ लायसन्सची घरातूनच परीक्षा देण्यासाठी संकेतस्थळावर जावे लागेल. आधार क्रमांक जोडून पुढील ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी सज्ज व्हाल. साधारण 15 प्रश्‍न परीक्षेसाठी असतील. यात किमान 9 प्रश्‍नांची उत्तरे बरोबर येणे गरजेचे आहे. साधारण 150 सेकंदात ही परीक्षा द्यावी लागेल, अशी माहिती परिवहन विभागाने दिली. परीक्षा पास झाल्यास शिकाऊ लायसन्सची प्रिंट परीक्षार्थी स्वत: काढू शकतो. त्यामुळे चालकाला शिकाऊ लायसन्सची मुदत संपल्यावरच कायमस्वरूपी लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओत यावे लागेल.

राज्यात दरवर्षी 15 लाखांपेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात. तसेच 20 लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी वर्षांला 100 कोटी रुपयांचा खर्च होतो. या सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे. तसेच हे काम करणार्‍या अंदाजे 200 मोटर वाहन निरीक्षक व अन्य कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळेल.

Exit mobile version