जनताच पर्यायी सरकार देईल- मल्लिकार्जुन खर्गे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशातील जनता येत्या 4 जून रोजी एक नवीन पर्यायी सरकार देईल, इंडिया आघाडी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल आणि आपण सर्व मिळून या देशाला सर्वसमावेशक, विकासात्मक सरकार देईल, सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ, असा विश्‍वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गुरुवारी सायंकाळी शेवटच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, 18 व्या लोकसभेची ही निवडणूक दीर्घकाळ स्मरणात राहील, कारण या निवडणुकीत देशातील प्रत्येक नागरिकाने लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मतदान केले आहे. पंतप्रधान आणि भाजप नेत्यांनी धार्मिक आणि फुटीरतावादी मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचे अगणित प्रयत्न केले; परंतु जनतेने मूळ मुद्दे लक्षात ठेवले, असे खर्गे म्हणाले. या निवडणुकीत देशातील प्रत्येक नागरिक जात, पंथ, धर्म, प्रदेश विसरून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आला आहे. लिंग, भाषा, धार्मिक आणि फुटीरतावादी मुद्द्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचे अगणित प्रयत्न भाजपने केले आणि आम्ही मुद्द्यांवर मत मागितल्याचेदेखील खर्गे म्हणाले.

Exit mobile version