। महाड । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये महागाईचा भडका उडालेला असून, हातावर पोट असणार्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेली जनताच आता 2024 मध्ये मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा विश्वास प्रदेश काँग्रेसच्या सचिव आणि महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी महागाईविरोधातील आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
वाढत्या महागाईविरोधात महाड शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.23) महाडमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपले विचार व्यक्त करताना केंद्रामध्ये असलेले मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप केला. महाड शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात या आंदोलनाला प्रारंभ झाला. स्वतः स्नेहल जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी बाजारपेठेतील व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधून महागाईबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. ग्राहकदेखील प्रतिक्रिया देताना, मोदी सरकारबद्दलचा संताप खुलेआमपणे व्यक्त करताना पहावयास मिळत होते.
2024 मध्ये पुन्हा मोदींना निवडून देणार नाही, असा निर्धारही असंख्य नागरिकांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात स्नेहल जगताप यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, शहराध्यक्ष सुदेश कळमकर, माजी नगरसेवक संदीप जाधव, प्रमोद महाडिक, पूजा जगताप, अस्मिता शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.