परफेक्ट कार्यक्रम?

प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये करून मिडियामधून गाजवलेला सिनेमा दणकून आपटावा तसा प्रकार एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या बाबतीत बुधवारी मुंबईत झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आपण कसा परफेक्ट कार्यक्रम केला असे सध्या शिंदे जिकडेतिकडे सांगत असतात.  पण मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे यांचाच परफेक्ट कार्यक्रम झालेला दिसतो. शिंदे यांनी सध्या भाजपची आणि त्यातही मोदी-शहा व फडणवीस या तीन महागुरुंची शिकवणी लावलेली आहे. पण ही शिकवणी काल चांगलीच कमी पडली. अर्थात तसे झाल्याने या गुरुंना दुःख तर सोडाच गुदगुल्या झाल्या असण्याचीच शक्यता अधिक. शिवसेना तर कमकुवत झालीच पण शिंदे गटाचा वरचष्मा होण्याची शक्यता उरली नाही असे सुखद संकेत त्यांना काल मिळाले असतील. असो. शिवाजी पार्कच्या मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी जमवायची आहे इतकेच काय ते शिंदे यांनी डोक्यात घेतले होते असे दिसले. त्यानुसार महाराष्ट्रभरातून त्यांनी माणसे तर भरपूर जमा केली. एसटी बसेससाठी दहा कोटी रुपये, स्पेशल रेल्वेगाड्या, खासगी गाड्या, आलेल्या प्रत्येकाला जेवण, पाणी हा सर्व खर्च कोणी व कशासाठी केला हा एक वेगळ्या तपासाचा विषय आहे. मात्र ही तयारी करताना शिंदेसाहेब बहुदा भाषणाची तयारी करायला विसरले. त्यामुळे जे काय विचार, विचार म्हणून गाजावाजा केला जात होता ते शिंदे यांच्या भाषणात कुठे आढळलेच नाहीत. शिंदे हे चांगले वक्ते नाहीत हे तर उघडच आहे. पण इतक्या हिकमती करून मुख्यमंत्रिपद मिळवलेल्या नेत्याला न वाचता, उस्फूर्तपणे चार मुद्दे मांडता येऊ नयेत हे केविलवाणे आहे. त्यामुळेच या भाषणाला लोकांची दाद मिळाली नाही व शेवटी तर गर्दी उठून गेली. भाषणाचा बराचसा भाग आम्ही बंडखोरी का केली याविषयी जुनेच मुद्दे सांगण्यात गेला. आम्ही गद्दार नाही तर गदर म्हणजे क्रांतिकारक आहोत असे ते म्हणाले. पण स्वातंत्र्यलढ्यातील एका लखलखत्या चळवळीशी जोडली गेलेली ही संज्ञा त्यांनी सत्तेसाठीच्या पंचतारांकित बंडाशी जोडणे हे अयोग्य होते. उद्धव यांच्यापेक्षा आपले हिंदुत्व वेगळे काय आहे हे ते सांगतील असे काही जणांना वाटत होते. पण गणेशोत्सव, नवरात्र दणक्यात करणे आणि केंद्राने पीएफआयवर बंदी घातली तर तिचे स्वागत करणे म्हणजे हिंदुत्व इतकीच शिंदे यांची कल्पना आहे. पीएफआयचा एकाएकीच जणू शोध लागला अशा आविर्भावात केंद्राने नुकतीच जी कारवाई केली तिचे टायमिंग संशयास्पद आहे. शिवाय तिच्यावर मोठी कारवाई केरळातील डाव्या कम्युनिस्ट सरकारने पूर्वीच केली आहे. हा इतिहास शिंदे यांना ठाऊक असण्याची शक्यता नाही. संघाविषयी बोलताना जनाची नाहीतर मनाची लाज बाळगण्याचा जो सल्ला त्यांनी विरोधकांना दिला त्यामुळे हे संघाचे प्रवक्ते आहेत की काय असाच प्रश्‍न पडावा. हा शिवसेना पक्षाचा मेळावा असताना तिथे संघ, शहा, मोदी यांचा इतका जप कशासाठी? सेना-भाजप युती असताना देखील बाळासाहेब ठाकरे संघवाले म्हणजे नुसतेच बोलणारे लोक म्हणून खिल्ली उडवत असत, हे शिंदे यांना आजूबाजूच्या जुन्या नेत्यांनी सांगायला हवे. खरी शिवसेना आपली आहे हे निवडणूक आयोगापुढे सिध्द करण्याच्या दिशेनं शिंदे यांचे सर्व प्रयत्न चालू आहेत. बुधवारचा मेळावा हा त्याचाच भाग होता. त्यासाठी गर्दी तर जमली. पण त्यामुळे शिंदे गटाचा करिश्मा वाढला का, याचं उत्तर नाही, उलट कमीच झाला असं आहे.
भाषण  हाच कार्यक्रम?
शिंदे गटाने बरीच हवा केल्याने शिवाजी पार्कवरच्या शिवसेनेच्या सालाबादच्या मेळाव्याचे काय होणार याचे बरेच औत्सुक्य होते. पण आमदार व खासदार सोडून गेले असले तरी शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत असे चित्र काल दिसले. उद्धव यांना यामुळे दिलासा मिळाला असेल. तसे त्यांनी भाषणात बोलूनही दाखवले. अनेक वर्षांपासून सेनेचा दसरा मेळावा हा मुख्यतः मुंबईकर शिवसैनिकांचा  कार्यक्रम. बाळासाहेबांचे भाषण हा त्यातील मुख्य आकर्षणाचा विषय असल्याने इतर पक्षांचे लोकही या मेळाव्याला येत असत. उद्धव यांच्यापासून ते आकर्षण कमी झाले तरी सेना अजूनही गर्दी जमवू शकते हे काल पुन्हा एकदा दिसले. किंबहुना, शिंदे यांच्या सभेला मुख्यतः मुंबईबाहेरील तर उद्धव यांच्या सभेला मुंबईतून लोक आले होते. सेनेच्या सभेत नेहमीचा जोष दिसला. शिंदे गटाच्या सभेत त्याचाच नेमका अभाव होता. उद्धव यांनी आपल्या भाषणात फार नवे मुद्दे मांडले नाहीत. मात्र गाईवर नको, महागाईवर बोला हे त्यांनी मोदी-शहांना दिलेले थेट आव्हान आणि बिल्किसबानूंवर अत्याचार करणारे तुरुंगातून सुटल्यावर त्यांचे स्वागत करणे हे कोणत्या हिंदुत्वात बसते हा त्यांचा सवाल लक्षात घेता ते भाजपला शिंगावर घेण्यासाठी सज्ज आहेत असे दिसले. अर्थात, हे केवळ टाळ्या मिळवण्यासाठी केलेलं वक्तव्य नसावं अशी अपेक्षा आहे. आगामी काळात महागाई, बेकारी, धर्मांधता इत्यादी प्रश्‍नांवर सेनेने सातत्याने आवाज उठवला तरच उद्धव यांच्या या म्हणण्याला काही अर्थ राहील. अन्यथा, राज ठाकरे यांचं भाषण हाच पक्षाचा एकमेव कार्यक्रम ही मनसेची जशी अवस्था झाली आहे तशीच शिवसेनेची होईल. तसं झालं तर सेनेची ताकदही मनसेइतकीच कमी व्हायला वेळ लागणार नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर आमनेसामने चर्चा करण्याचं आव्हान उद्धव यांनी भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांना दिलं. तेही स्वागतार्ह आहे. शिवसेनेनं प्रबोधनकार ठाकर्‍यांचं भटा-ब्राह्मणांना आणि देवळांना नाकारणारं प्रागतिक हिंदुत्व स्वीकारावं असं शिवसेनेबाहेरील त्यांच्या सध्याच्या हितचिंतकांना वाटतं. भाजपचा मुकाबला करण्यासाठी जो कोणी उभा राहील तो आपला अशी या हितचिंतकांची भूमिका आहे. त्यानुसार उद्धव यांनी सेनेच्या विचारसरणीला खरंच वेगळी दिशा दिली तर ते स्वागतार्ह असेल. पण आजवर 1992-93 च्या दंगलीत मुस्लिमांपासून मुंबईचं रक्षण आम्हीच केलं असं अभिमानाने सांगणार्‍या शिवसेनेमध्ये एकाएकी खरेच मूलभूत बदल होऊ शकेल का हा प्रश्‍नच आहे. थोडक्यात, शिंदे व भाजप यांनी कोपर्‍यात रेटल्यामुळे उद्धव आज जी भाषा बोलत आहेत ती कायम राहणार का हा प्रश्‍न बाकी आहे. पण तूर्तास तरी  उद्धव यांनी सकारात्मक सुरुवात केली आहे असे म्हणावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या युतीमुळे शिंदे हे त्यांना लक्ष्य करीत असल्याने महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत बोलणे सध्या टाळणे हे समजण्यासारखे आहे. मात्र हा मुद्दा फार काळ टोलवता येणार नाही. तेव्हा शिवाजी पार्कचे मैदान गाजवले असले तरी उद्धव यांचे खरे घोडामैदान आता सुरू होणार आहे.

Exit mobile version