नारंगीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

राजेंद्र म्हात्रेंच्या पुढाकारातून अद्ययावत विहिरीचे काम सुरू

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नारंगी गावातील नागरिकांच्या पाणीटंचाईच्या समस्येला आता अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गंगाधर म्हात्रे यांच्या पुढाकारातून भुवनेश्वर परिसरात अत्याधुनिक आणि मोठ्या क्षमतेची विहीर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या विहिरीमुळे नारंगी गावासह नारंगी नवीन वसाहतीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शासनाकडून विविध योजना जाहीर होत असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र, नारंगी ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र म्हात्रे यांनी या प्रश्नावर स्वतः पुढाकार घेत पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

नारंगी गाव आणि नारंगी नवीन वसाहतीतील नागरिकांना मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने नारंगी ग्रामस्थ मंडळाने स्वतःच्या मालकीची जागा विहिरीसाठी उपलब्ध करून दिली आहे. तर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकी जपत या विहिरीच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

उभारण्यात येणारी ही विहीर तब्बल 30 फूट खोल आणि 35 फूट रुंद असणार आहे. विहिरीचे बांधकाम पूर्णपणे चिरांच्या दगडांमध्ये करण्यात येणार असून, मजबूत आणि दीर्घकालीन रचना उभारण्यावर भर दिला जात आहे. सध्या विहिरीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली असून, येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास अडथळा निर्माण होऊ नये यासाठी स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नारंगी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गंगाधर म्हात्रे, अनिल धुमाळ, अमोल पाटील, भालचंद्र म्हात्रे, नरेश म्हात्रे, संजीव पाटील, शेखर धुमाळ, वैभव धुमाळ, ओमकार बहाडकर, प्रभाकर ठाकूर, संजय म्हात्रे, मोहन पाटील, रमाकांत म्हात्रे, प्रदीप पाटील, विक्रम पाटील, सचिन पाटील, पार्थ पाटील, प्रदीप धुमाळ, प्रभाकर म्हात्रे, नरहरी म्हात्रे, तेजस म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारंगी ग्रामस्थ मंडळाने पाण्याच्या प्रश्नासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्या जागेत विहीर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या बांधकामाचा सर्व खर्च मी स्वतः करत आहे. ही विहीर पूर्ण झाल्यानंतर गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल.

– राजेंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य

नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर परिसरात नारंगी ग्रामस्थ मंडळाच्या मालकीची जागा होती. ही जागा पूर्वीपासून पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गंगाधर म्हात्रे यांच्या पुढाकारातून त्या ठिकाणी विहीर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

– हरिश्चंद्र म्हात्रे, अध्यक्ष, नारंगी ग्रामस्थ मंडळ

Exit mobile version