। पंढरपूर । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढीवारी प्रतिकात्कम स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपूरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले,आषाढी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे. कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालखी सोहळ्याबात शासनस्तरावर निर्णय घेण्यात आलेला असून, वारी प्रतिकात्मक स्वरुपात पार पाडण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी.नगरपालीकेने वाखरी पालखी तळावरील अनावश्यक काटेरी झुडपे काढून स्वच्छता करावी, स्वछ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मंडपाची व्यवस्था करावी. प्रदक्षिणा मार्गावर आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्ती व तात्पुरते बॅरेकेटींक करावे.नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने परवानगी दिलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करावी. आरोग्य विभागाने ऑक्सिजन, रक्तपुरवठा, औषधसाठा मुबलक प्रमाणात राहिल याबाबत नियोजन करावे.लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नदीपात्रात सोडण्यात येणार्या पाण्याचे नियोजन करावे , अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.
आषाढीवारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम उपस्थित होते.