। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
नवीन मासेमारी कायद्यातील जाचक अटींमुळे पर्सीननेट मासेमारी धोक्यात आली असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील पर्ससीननेट मच्छिमारांनी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संपूर्ण जिल्ह्यातून मच्छिमार, नौका मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असलेले उद्योजक, व्यावसायिक या मोर्च्यामध्ये सहभागी झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांत होऊन नेत्यांनी मोर्चाचे उद्देश स्पष्ट केले. समुद्रातील मत्स्य साठयावर होणार्या प्रतिकूल परिणामाला प्रत्येकवेळी पर्सीननेट मासेमारीलाच जबाबदार धरून या मासेमारीवर जाचक निर्बंध लावण्यात आले. या संदर्भात मागील अभ्यास गटाच्या आदेशानुसार पर्सीननेट मासेमारी कालावधी, समुद्र क्षेत्र, परवाना नूतनीकरण व नवीन परवाना देण्याबाबत निर्बंध टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर, सुधारित कायद्यामध्ये पर्सीननेट मासेमारीला उदध्वस्त करणार्या तरतुदी असल्याचे उपस्थित नेत्यांनी भाषणामध्ये स्पष्ट केले. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मत्स्यसाठा जतन करण्याबाबत नव्याने होणार्या अभ्यासात ट्रॉलनेट, डोलनेट, गिलनेट, हूक अॅन्ड लॅन्ड या मासेमारीचाही अभ्यास झाला पाहिजे, अशीही मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. सागरी मासेमारीच्या सुधारित कायद्यातील जाचक अटींविरोधात गेल्या 3 जानेवारीपासून साखळी उपोषणही सुरु आहे.
मात्र, त्याचीही योग्य दखल घेतली गेली नाही, अशी आंदोलकांची तक्रार आहे. पर्सीननेट संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन आपल्या भावना त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी लतीफ मालदार, हनीफ मालदार, मेहबुब फडनाईक, सुहेल साखरकर, जावेद होडेकर, नासीर वाघु, विकास सावंत, विजय खेडेकर, प्रतिक मोंडकर आदींसह मच्छिमार उपस्थित होते.